gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात निसर्ग मंडळाचे उद्घाटन संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात निसर्ग मंडळाचे उद्घाटन संपन्न

खारफुटीचीची वने ही अतिशय दुर्मिळ व उत्पादनशील असून ती नेत्रदीपक असतात. या वनांच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी दि. २६ जुलै हा दिवस ‘जागतिक खारफुटी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात १९८३ पासून कार्यरत असलेल्या ‘निसर्ग मंडळाच्या’ (नेचर क्लब) उद्घाटन समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. सुभाष पुराणिक, सहाय्यक वनसंरक्षक, सावंतवाडी उपस्थित होते. त्यांनी ‘निसर्गसंवर्धनात युवकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान दिले. निसर्गात वावरत असताना आपण कोणती खबरदारी घ्यावी, मानवी कृतींमधून निसर्गाचा कसा ऱ्हास होत चालला आहे, अवाजवी पर्यटन व पक्षी निरीक्षणाचे निसर्गावरील विपरीत परिणाम इ. गोष्टी त्यांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिल्या. निसर्गसंरक्षणासाठी संविधानामध्ये नमूद केलेल्या कायद्यांची माहितीदेखील त्यंनी दिली. तसेच त्यांना वनसंवर्धन अधिकारी म्हणून काम पाहत असताना आलेले विविध प्रकारचे अनुभव त्यांनी विषद केले. जगाच्या पाठीवर खूप कमी वने शिल्लक राहिली आहेत व त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने हातभार लावला पाहिजे असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी निसर्ग फोटोग्राफी स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले; यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे करण्यात आले होते. निसर्ग मंडळाचे सदस्य प्रा. नितीन पोतदार, प्रा. श्वेता लाड, प्रा. कश्मिरा राऊत, प्रा. भक्ती साळकर आणि विज्ञान विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अंबादास रोडगे यांनी, सूत्रसंचालन प्रा. मयुरेश देव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. मोहिनी बामणे यांनी केले.

Comments are closed.