gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २७ फेब्रुवारी हा ‘मराठी राजभाषा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ह.भ.प कु. सायली विजय मुळ्ये विद्यार्थिनीचे ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या विषयावरील कीर्तन व ख्यातनाम दिग्दर्शक राजेंद्र बडे यांचे ‘मराठी नाटक व चित्रपट यांचा आस्वाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

मराठी भाषा दिनाच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, ख्यातनाम दिग्दर्शक राजेंद्र बडे, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे , इतिहास विभाग प्रमुख डॉ. रमेश कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. गोपाळे यांनी मराठी विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यानंतर प्राचार्यांनी मराठी भाषेचे अलौकिकत्व कसे जपावे, भाषेचे जतन व संवर्धनाकरिता कोणते प्रयत्न करावेत याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी मुंबई विद्यापीठ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या उजळणी वर्गातील प्राध्यापक देखील उपस्थित होते. सहभागी प्राध्यापक वर्गातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, इस्लामपूर, जि. सांगली येथील प्रा. अमोल पुंडलिक चांदेकर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले.

सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कीर्तनात पूर्वरंगात कु. सायली हिने मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली यावर भाष्य केले. ‘आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने’ यावर निरुपण सादर करून आद्य आत्मचरित्रकार, कीर्तन परंपरेचे प्रवर्तक नामदेवमहाराजांवरील आख्यान सादर केले. नाटक व चित्रपट माध्यमांचा आस्वाद कसा घ्यावा याचे उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजेंद्र बडे यांनी आवर्जून नमूद केले की ‘स्वतःच्या अनुभवातून, प्रेरणांतून जी कलाकृती तयार होते तिच्यामुळेच प्रेक्षकांना समाधान देता येते. चित्रपटांमध्ये शब्दांच्या भाषेपेक्षा ‘चित्रभाषा’ आनंददायक असते; ती समजून घेता आली पाहिजे.’

मराठी विभागाने या निमित्ताने ‘माझा मराठाचि बोलू कवतुके’ या विषयावर भित्तीपत्रक व मराठी भाषेतील विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या दरम्यान लेखन नैपुण्य प्राप्त केलेल्या कु. श्रद्धा हळदणकर या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.