gogate-college

15 वर्ष परंपरा असलेला महाराजा करंडक कोण पटकावणार?

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात झेप महोत्सवाची जोरदार तयारी

कार्यक्रम व्यवस्थापनाची स्पर्धा घेणारे एकमेव महाविद्यालय

माजी विद्यार्थी पुरस्कृत महाराजा करंडकचे पंधरावे वर्ष

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे झेप हे युवा सांस्कृतिक स्नेहसंमेलन दिनांक २२, २३ व २४ डिसेंबर रोजी होणार असून त्याची जोरदार तयारी सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी वर्ग करत आहे. १९९५ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी पुरस्कृत केलेल्या महाराजा करडंकचे हे पंधरावे वर्ष आहे. कार्यक्रम व्यवस्थापनासाठी दिला जाणारा हा करंडक बहाल करणारे महाराष्ट्रातील हे एकमेव महाविद्यालय आहे. यावर्षीचा करंडक कोण जिंकणार याची उत्सुकता विद्यार्थी वर्गात लागून राहिली आहे.

स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभाला ढोल-ताशांच्या गजरात दिंडी निघणार आहे त्यानंतर खातू नाट्यमंदिर येथे उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन व सचिव सतीश शेवडे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात सोनी टि.व्ही. मरा वरील हास्यजत्रा शो चा विजेता अभिनेता आणि गोगटे-जोगळेकर विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रथमेश शिवलकर तसेच ‘यदाकदाचित रिटर्न्स’ फेम रोहित शिवलकर व नंदकिशोर जुवेकर हे माजी विद्यार्थी हजेरी लावणार आहेत. गुरु शिष्य संवाद या कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तीनही दिवस कार्यक्रमांची रेलचेल आहे. प्रदर्शनांमध्ये रांगोळी, चित्रकला, फोटोग्राफी, भौतिकशास्त्राचे आगळेवेगळे अवकाश प्रदर्शन, आयटी विभागाचे लॅन गेमिंग, आणि ‘झू जर्नी’ प्राणीशास्त्र विभागाचे प्रदर्शन, ललित कला, बाईक प्रदर्शन ही आगळीवेगळी प्रदर्शने आहेत. वाङ्मयीन कार्यक्रमांमध्ये वाद-विवाद, गुरुशिष्य संवाद आणि टॉक शो असे स्पर्धात्मक कार्यक्रम असणार आहेत. मेगा इव्हेंट मध्ये म्युझिक कॉन्सर्ट, व्हर्सटाईल पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा यांचा समावेश आहे. दांडेकर मानचिन्ह ही मानाची अभिनय स्पर्धा २४ तारखेला होणार आहे. दोन प्रकारचे फॅशन शो आयोजित करण्यात आले आहेत,ज्यामध्ये पाश्चात्य व पारंपरिक या दोन्हीचा संगम असणार आहे. रोज किंग-क्वीन, चॉकलेट किंग- क्वीन या तरुणाईच्या आवडत्या स्पर्धांचा समावेश असणार आहेच. यावर्षी प्रथमच लाईव्ह कॉन्सर्ट सादर करण्यात येणार आहेत जेणेकरून या स्नेहसंमेलनातून पुढे व्यावसायिक दृष्ट्या कलाकार तयार व्हावेत. या कॉन्सर्ट साठी माजी विद्यार्थी सहकार्य करत आहेत.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर तसेच प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या युवा महोत्सवासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख आनंद आंबेकर, विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद जांगळे आणि विद्यार्थी व्यवस्थापक मंडळ मेहनत घेत आहे.

Comments are closed.