gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘लोकमान्य टिळकांना अभिवादन’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे भारतीय स्वतंत्र्यलढ्याचे आद्यप्रवर्तक, असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना त्यांच्या ९८व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्री. विनय धुमाळे यांचे विशेष व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीचे विविध पैलू उलगडून दाखविले. ‘लोकमान्य टिळकांसारख्या महान व्यक्तिमत्वाचे रसग्रहण करणे अत्यंत अवघड कार्य आहे. रत्नागिरीत जन्मलेल्या या व्यक्तीने विश्वातील अनेक क्षेत्रांना गवसणी घालण्याचे कार्य केले. पारतंत्र्याच्या काळातही समाजप्रबोधन, राजकारण, शिक्षण, पत्रकारिता अशा विविधांगी क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला. स्वतःच्या भविष्याचा विचार न करता त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशाचाच विचार केला. भारताच्या वेदकालीन संस्कृतीवर आपल्या अभ्यास आणि लेखनातून प्रकाश टाकला. याची प्रचिती त्यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथात येते. विद्यार्थ्यांनी टिळकांमध्ये असलेले अतुलनीय वैचारिक धाडस, जिद्द, चिकाटी हे गुण आत्मसात केले पाहिजेत.’ असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्याची महाविद्यालयाची परंपरा अत्यंत जुनी आहे. लोकमान्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा आणि देशहिताच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
महाविद्यातील गणित आणि मराठी विषयात विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कै. उन्मेष घाटे आदर्श विद्यार्थी पारितोषिक गणित विभागाच्या ओंकार जावडेकर याला तर कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक कु. उत्कर्षा भुते आणि कु. वैष्णवी टीपगुडे यांना प्रदान करण्यात आले. लोकमान्य टिळक पारितोषिक कु. तीर्था सामंत हिला तर कै. गणेशशास्त्री घाटे पारितोषिक कु. समीक्षा पालशेतकर हिला प्रदान करण्यात आले. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या ‘वक्तृत्व आणि निबंध’ स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्तेपारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. निधी पटवर्धन यांनी करून दिला. सदर समारंभाला चारही विभागांचे उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Tilak Punyatithi
Comments are closed.