gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे ‘लोकमान्य टिळक जन्मदिनी’ अभिवादन यात्रा संपन्न

लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरु झालेली अभिवादन यात्रा टिळक जन्मभूमी येथे आल्यानंतर संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी गीतेच्या ‘भक्तियोग’ अध्यायाचे पठण केले. तसेच जी.जी.पी.एस.च्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्री. प्रतापराव चव्हाण यांनी शब्दबद्ध केलेले ‘रत्नभूमी ही पावन सुंदर’ हे गीत सादर केले. यात्रेचे हे १३वे वर्ष आहे.
त्यानंतर लो. टिळकांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. मुंबई दूरदर्शनचे श्री. धुमाळे यांनी लो. टिळकांच्या जीवनावर आधारित एक चित्रफीत तयार केली असून सदर चित्रफीत टिळकांना अर्पण करण्याचा सोहोळा याप्रसंगी संपन्न झाला. त्यानंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपल्या मनोगतात ‘लोकमान्य टिळक एक व्यासंगी, अष्टपैलू आणि भारतीय स्वातंत्र्याचे जनक होते. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात टिळकांनाही आपला ठसा उमटविला नाही. राजकारण, स्वातंत्र्य लढा, वकिली, पत्रकारिता, विविध संघटन कार्य अशा सर्वच क्षेत्रात टिळकांनाही आपली हस्तमुद्रा उमटविलेली दिसते. भारतीयांचा असंतोष ब्रिटिशांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीयांचे प्रतिनिधीत्व ब्रिटिश सरकारसमोर इंग्लंड या ठिकाणी टिळकांनी केले; याला ‘होमरूल’ असे म्हटले जाते. टिळकांनी भारतीयांचे म्हणणे ब्रिटिश पार्लमेन्टमध्ये मांडले. अशाप्रकारे भारतीय जेव्हा पारतंत्र्यात होते तेव्हा भारतीयांचे म्हणणे जगासमोर मांडावे जगाचा पाठिंबा त्याला मिळावा आणि ही भूमी स्वतंत्र व्हावी यासाठी टिळकांनी मोलाची भूमिका बजावली’ याविषयी विद्यार्थ्यांना उद्देशून विवेचन केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या अभिवादन यात्रेस राष्ट्रीय सेवा योजना यांच्यासह ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होते. कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, कार्यक्रम समिती प्रमुख डॉ. निधी पटवर्धन आदींसह प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.
अभिवादन यात्रेस रत्नागिरीतील प्रतिष्ठित उद्योजक श्री. नानासाहेब भिडे आणि श्री. आनंद भिडे यांच्या उपस्थितीत सर्वांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाचे सांगता झाली. कार्यक्रमाला पुरातत्व अधिकारी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच जोशी कुटुंबीय यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले.

Comments are closed.