gogate-college

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबुराव जोशी ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबुराव जोशी ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ज.वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी प्रतिमापूजन, ग्रंथप्रदर्शन आणि महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांचे अभिवादनपर भाषण असा कार्यक्रम पार पडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे आकर्षक असे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेतील ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘बहिष्कृत भारत आणि मूकनायक’, आदी पुस्तकांपासून ते उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेली संविधान, चरित्र साधने, ‘बोल महामानवाचे’ हि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ५०० भाषणे, साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेले ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ हे के. राघवेंद्र राव यांनी लिहिलेले व धनंजय कीर यांनी लिहिलेले डॉ. बाबासाहेबांचे चरित्र आदी उत्तमोत्तम ग्रंथांचा समावेश होता.

डॉ. यास्मिन आवटे यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक पैलू उलगडले. ज्ञानी, विजीगुषी, वाचक, नियोजक अशा पैलूंचा मागोवा घेताना डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावरील विविध घटनांचे दाखले दिले.

डॉ. आंबेडकर यांची ग्रंथसंपदा वाचून त्यांचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प आजच्या शुभदिनी करूया असेही आवाहन केले. या कार्यक्रमात ग्रंथपाल प्रा. किरण धांडोरे, ग्रंथालय समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. मोहन कांबळे तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.