gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. संजय जगताप यांचे ‘महाविद्यालयीन स्वायत्तता’ या विषयावरील व्याख्यान संपन्न

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोकण विभाग, उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप यांचे ‘महाविद्यालयीन स्वायत्तता’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अंतर्गत मूल्यनिर्धारण समितीच्यावतीने ‘महाविद्यालयीन स्वायत्तता’ या विषयावर एका विशेष संवादपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानप्रसंगी कोकण विभागाचे उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी, शिक्षण क्षेत्रात त्यामुळे होणारे अमुलाग्र बदल, सध्याची शिक्षणपद्धती, महाविद्यालयीन स्वायत्तता, स्वायत्तता प्रक्रिया, स्वायत्ततेमुळे महाविद्यालयांना होणारे फायदे अशा विविध पैलूंवर आपले विचार मांडले.

डॉ. जगताप पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीकेंद्रित, सर्वसमावेशक, आंतरविद्याशाखीय असून सर्व शाखांचे शिक्षण विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळेल, अशी अवस्था या शैक्षणिक धोरणात आहे. तसेच शिक्षकांनीदेखील काळानुरूप आपल्या अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत बदल करून समाजाच्या, देशाच्या प्रगतीत हातभार लावला पाहिजे, असे नमूद केले. यानंतर त्यांनी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आणि शंकांचे निरसन केले.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील एक नामवंत आणि प्रतिष्ठीत महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा त्यांनी सांगून महाविद्यालयाचे झालेले नॅक मुल्यांकन, त्याची कार्यपद्धती आणि फलित याविषयावर सविस्तर माहिती दिली.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी करून दिला. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, महाविध्यालायातील विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन तर प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, श्री. कुमार काकतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.