gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालायात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्र. कुलगुरू डॉ. मगरे यांचे विशेष व्याख्यान संपन्न

Dr. Amebedkar Jayanti

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ आणि एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांचे ‘राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार आणि आजचे वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थातीतांना मार्गदर्शन करताना डॉ. मगरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण व्यवस्थेला दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. शिक्षण व्यवस्थेच्या विकासासाठी त्यांचे विचार किती मौलिक आहेत याचे समकालीन संदर्भ त्यांनी स्पष्ट करीत उपस्थातीतांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. आज विद्यापीठ स्तरावर कार्यरत विविध आस्थापनांच्या स्थापनेचा विचार त्यांनी त्याकाळी मांडला होता. याचे जिवंत उदाहरण म्हणजे विद्यापीठ स्तरावरील ‘विद्यापरिषद’ ही आस्थापना होय. शिक्षण व्यवस्थेत विद्यापीठाकडे आलेल्या परीक्षा आणि त्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन, ज्ञाननिर्मितीच्या कार्याकडे झालेले दुर्लक्ष या विषयासंधार्भातही त्यांनी आपले विचार मांडले.

विद्यापीठ, महाविद्यालये आणि त्यांची स्वायत्तता या आजच्या बहुचर्चित विषयांसंधर्भातही डॉ. आंबेडकर यांनी मांडलेले विचार हे शिक्षणक्षेत्राच्या भविष्यकाळासंदर्भातील दृष्टिकोनाचे आणि असीम दूरदृष्टीचे उदाहरण ठरते. डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वातील प्रज्ञा, शिल आणि करुणा या पैलूंचे समर्पक विवेचन करीत डॉ. मगरे यांनी मानव विकासाचा मूलमंत्र म्हणून डॉ. आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या सूत्राचा उल्लेख केला. महिला, दलित, श्रमिक आणि वंचितांबद्दलची असलेली कणव आणि त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी उचललेली पाऊले यांचे समर्पक दर्शन डॉ. मगरे यांनी केले.

ग्रंथांवरती विशेष प्रेमासाठी सर्वपरिचित असणारे डॉ. आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी कायम प्रेरणादायी ठरणारे आहेत. ग्रंथाभ्यास, चिकाटी आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरच ते संविधान निर्मितीत महत्वाचे योगदान देऊ शकले, असेही ते पुढे म्हणाले.

या कार्यक्रमप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी आदि मान्यवरांसह महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच कार्याक्रमामद्धे नैपुण्यप्राप्त शिक्षकांचा आणि विद्यर्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या ‘सहकार’ या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. आरती पोटफोडे यांनी केले.

Comments are closed.