gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. प्र. ना. देशमुख स्मृती समारंभ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. प्र. ना. देशमुख स्मृतीसमारंभ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे माजी विभागप्रमुख कै. पी. एन. देशमुख स्मृती कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने ‘हर्बल कॉस्मेटिक्स’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ. रेणुका थेरगावकर, संचालक, ग्लोबल कन्सल्टंटस, मुंबई; डॉ. दिलीप रोहरा, नियामक मंडळ सदस्य डॉ. कल्पना मेहता, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रा. जी. एस. कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना डॉ. मंगल पटवर्धन यांनी प्रा. देशमुख यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू विषद केले. विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून ते कशाप्रकारे प्रत्यत्न करत असत हे सविस्तर सांगितले. तसेच प्रात्यक्षिके कशी आनंददायी आणि स्पर्धात्मक करीत असत, सौंदर्य हे मनाचे आणि शारीरिक दोन्ही कसे महत्वाचे असते, प्रत्येक व्यक्ती सुंदर असते, आत्मविश्वास आपले सौंदर्य अधिक खुलवतो असे ते सांगत; याबद्दलही आपल्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांनी सौंदर्यप्रसाधनांचा वापर व लिंगसमभाव या विषयावरही मार्गदर्शन केले.

याच कार्यक्रमात ‘नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वनस्पती’ या विषयावर घेण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शन आणि पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले. यानंतर माजी विभागप्रमुख प्रा. जी. एस. कुलकर्णी यांनी स्पर्धा परीक्षकांच्या भूमिकेतून मार्गदर्शन करून स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

डॉ. कल्पना मेहता यांच्या हस्ते कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ. रेणुका थेरगावकर त्यांचे सहकारी डॉ. दिलीप रोहरा आणि डॉ. निलेश जाधव यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉ. रेणुका थेरगावकर यांनी अशाप्रकारची कार्यशाळा घेण्यासाठी रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात येण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी या क्षेत्रातील विविध संधींची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी वनस्पतीशास्त्र विभाग आयोजित करत असलेल्या विविध उपयुक्त उपक्रमांची प्रशंसा केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधींचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. सोनाली कदम यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. शरद आपटे यांनी केले.

कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये डॉ. रेणुका थेरगावकर यांनी कॉस्मेटीक्सचे विविध प्रकार, हर्बल कॉस्मेटीक्स ते बनविण्याच्या विविध पद्धती, प्रकार यांची सविस्तर माहिती दिली. तसेच कॉस्मेटीक्समध्ये सुगंधी तेलाचे महत्व याविषयीही मार्गदर्शन केले आणि वासावरून तेलाचे प्रकार कसे ओळखावेत ते शिकवले.

पुढील सत्रात प्रत्यक्ष सौंदर्य प्रसाधने बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये कोरफड जेल, ऑर्ग्यानीक फेस पॅक व टाल्कम पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

विज्ञान विभागातील ६१ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थी या प्रशिक्षणात मनस्वी रंगून गेले होते. त्यांनी या सर्वचा आनंद घेतला व व्यक्तही केला.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. प्र. ना. देशमुख स्मृतीसमारंभ संपन्न
h
Comments are closed.