gogate-college

गोगटे-जोगळेकर महाविद्यालातर्फे लोकमान्य टिळकांना स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त अभिवादन

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आद्यप्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी नेते लोकमान्य टिळकांचे एक तत्त्वज्ञ, तत्त्ववेत्ता म्हणून विचार आणि स्वीकार केला तर टिळकांचे विचार आणि वारसा कधीही कालबाह्य होऊ शकत नाही, असे प्रतिपादन प्रा. डॉ. हिमानी चौकर यांनी केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानात त्या बोलत होत्या.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त तात्त्विक समुपदेशक आणि तर्काधिष्ठित उपचारपद्धती तज्ज्ञ आणि रुईया महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागाच्या विभागप्रमुख प्रा.हिमानी चौकर यांच्या ‘तात्विक समुपदेशन उपचारपद्धती आणि लोकमान्य टिळक’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. चौकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून तर्काधिष्ठित उपचारपद्धती, तिचा उगम आणि विकास, तिचे दैनंदिन जीवनातील उपयोजन यांचे महत्त्व विशद करून लोकमान्य टिळकांचे तत्वज्ञान आणि तर्काधिष्ठित उपचारपद्धती यांच्यातील परस्पर संबंधविषयक विविध पैलू उलगडून दाखवले. डॉ.चौकर पुढे म्हणाल्या, टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा असून, निष्काम कर्मयोगाचे आयुष्य कसे जगावे हे त्यातील तत्त्वज्ञान सांगते.टिळकांचे तत्वज्ञान आणि विचार समकालीन परिस्थितीशी निगडीत असून, भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी निश्चितच मार्गदर्शनीय आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचार-कार्यापासून स्फुर्ती घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाला शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढयातील योगदान आणि कार्याचे स्मरण राहावे, म्हणून दरवर्षी महाविद्यालयाच्या वतीने अभिवादन यात्रा आणि पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. टिळकांनी विद्यार्थीदशेत असतानापासूनच सार्वजनिक कार्यात आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या चतु:सूत्री आंदोलनाने देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाला वेगळे वळण दिले.लोकमान्यांचे विचार आजही आपणास मार्गदर्शनीय असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून स्फुर्ती घेतली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले. या व्याख्यानासाठी तिन्ही शाखेचे उपप्राचार्य, विभागप्रमुख, तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक-अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभारप्रदर्शन इतिहास विभागप्रमुख प्रा. पंकज घाटे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि अभ्यागत व्याख्यात्यांचा परिचय प्रा.डॉ.निधी पटवर्धन यांनी करून दिला.

Comments are closed.