gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘राष्ट्रीय कार्यशाळे’चे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित चार दिवसीय ‘राष्ट्रीय कार्यशाळे’चा ऑनलाइन उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. रसायनशास्त्रातील महत्वाच्या संकल्पना आणि या क्षेत्रातील संशोधनाची दिशा यासबंधी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘रिसेंट ट्रेन्डस इन ऑरगॅनिक अँड इनऑरगॅनिक केमिस्ट्री’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रसायनशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेदरम्यान नामवंत व्याख्याते विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, वेस्ट इंडिया विभागाच्या डॉ. लक्ष्मी रविशंकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

रसायनशास्त्र विभागाप्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी रसायनशास्त्रविभागाचे अभिनंदन करून अशा प्रकारच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील भविष्याचा वेध घेण्यासाठी उपयुक्त ठरतात असे सांगितले. कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी ‘विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल याचा विचार करावा’ असे प्रतिपादन केले.

आपण निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणते गुण, कौशल्ये आणि ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे यासबंधी डॉ. लक्ष्मी रवीशंकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे यांनी आभारप्रदर्शन केले.

सदर कार्यशाळेसाठी देशभरातील विविध राज्यांतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी इंडियन इंस्टिट्युट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन या जम्मूस्थित संस्थेत कार्यरत डॉ. एस.डी. सावंत यांनी ‘औषध निर्माण क्षेत्रातील संधोधानाच्या संधी’ याविषयी सविस्तर आणि उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

Comments are closed.