gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘७३वा भारतीय स्वातंत्र्यदिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘७३वा भारतीय स्वातंत्र्यदिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७३वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविधरंगी कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळी महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लेफ्टनंट प्रा. दिलीप सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. सीमा कदम यांनी केले.

त्यानंतर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘मला प्रभावित करणारे व्यक्तिमत्व आणि लेखक’ या विषयावरील सहकार भित्तीपत्रक आणि ‘चरित्रात्मक ग्रंथप्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले होते. या भित्तीपत्रकाचे अनावरण आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपप्राचार्य विवेक भिडे, डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. विशाखा सकपाळ, आजीव सभासद मंडळाचे सचिव प्रा. श्रीकांत दुदगीकर, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, प्रा. वैभव कानिटकर, लेफ्टनंट प्रा. अरुण यादव, प्रा. दिलीप सरदेसाई, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

त्यानंतर मुख्य इमारतीत गणित विभागाच्या ‘मॅथेमॅटिक्स अॅड मेडीकल सायन्स’; आय.टी. विभागाच्या ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’ आणि महिला विकास कक्षाच्या ‘महिला आणि संधोधन’ या विषयावरील मिळून साऱ्याजणी या भित्तीपत्रकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेल्या मुख्य समारंभात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ‘माध्यम’ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ‘मशाल’ या हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गुणगौरव करण्यात आला.

या समारंभाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालय, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी करीत असलेल्या विविध क्षेत्रातील नैपुण्याचा आढावा घेतला. महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयालयाला प्राप्त झालेल्या आय.एस.ओ.-९००१:२०१५ या प्रमाणीकरणाची माहिती देऊन ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. विवेक भिडे, प्रा. विशाखा सकपाळ उपस्थित होते.

यानंतर सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर स्पर्धेतील विजेत्या देशभक्तीपर समूहगीतांचे सादरीकरण संपन्न झाले. विशेष म्हणजे मॉरिशस येथील मराठी कल्चर सेंटर आयोजित आंतराष्ट्रीय संगीत महोत्सवात निवड झालेल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी जोशी हिने आपले शास्त्रीय गायन सादर केले. प्रा. आनंद आंबेकर यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या ७३व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शब्दबद्ध केलेल्या अजरामर अशा ‘जयोस्तुते’ या देशभक्तीपर समूहगीताचे गीताचे महाविद्यालयातील ७३ प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सुरेल सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘७३वा भारतीय स्वातंत्र्यदिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
Comments are closed.