gogate-college

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप’ महोत्सवाचे उद्घाटन दिमाखात संपन्न

Zep Inaugration

कोकणातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा लौकिक आहे. या लौकिकाला साजेशा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी महाविद्यालयात केले जाते. शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन दि. 22 डिसेंबर 2018 रोजी महाविद्यालयाच्या खातू नाट्यमंदिर येथे संपन्न झाले. ढोल- ताशे आणि लेझीमच्या तालावर जल्लोषपूर्ण वातावरणात या तरुणाईच्या उत्सवाला प्रारंभ झाला.

सळसळत्या तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालय कायमच प्रयत्नशील असते. महाविद्यालयात शिकणाऱ्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळते ते महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात अर्थात झेपमध्ये. यंदाच्या झेपच्या दिमाखदार उद्घाटन समारंभात कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली. कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडवणारी शोभायात्रा, श्री नटराजाची पालखी आणि सोबत अत्यंत प्रतिष्ठेचा महाराजा करंडक आकर्षणाचा केंद्र ठरले. त्यानंतर खातू नाट्यमंदिरात पार पडलेल्या उद्घाटन समारंभाचा प्रारंभ नटराज पूजन आणि श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन, कला शाखेच्या उपप्रचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्रचार्या डॉ. यास्मिन आवटे, सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, प्रा. बीना कळंबटे, प्रा. जयंत अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात खास कोकणी पद्धतीने गाऱ्हाणे घालून झाली. त्यानंतर मराठी रंगभूमीच्या सुवर्णयुगाची आठवण करून देणारी नांदी सादर झाली. महाविद्यालयाचा अष्टपैलू विद्यार्थी गौरव बंडबे याने गायलेल्या अभंगांनी वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर मानसी कळंबटे आणि राधा सोहनी यांच्या कथ्थक – भरतनाट्यम जुगलबंदीने प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. स्मितल कुरूप आणि तिच्या सहकाऱ्यांच्य लेझीम नृत्याने आणि गौरी साबळेच्या लावणी नृत्याने विद्यार्थ्यांना ताल धरायला लावला. तसेच साहिल कदम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेले ढोलवादनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सुतार आणि सौम्या पै यांनी केले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी केले होते. तरुणाईचा हा उत्सव तीन दिवस रंगणार असून विविध कार्यक्रमांची रेलचेल यात असणार आहे.

Zep Inaugration
Zep Inaugration
Comments are closed.