gogate-college

नव्या युवा पिढीने लोकमान्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज – प्रा. डॉ. अशोक चौसाळकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालातर्फे लोकमान्य टिळकांना “स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त” अभिवादन.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आद्यप्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी नेते लोकमान्य टिळकांचा राजकीय वारसा नव्या पिढीने पुढे नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने लोकमान्य टिळकांच्या १०० पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय विचारवंत, शिवाजी विद्यापीठातील माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांचे ‘लोकमान्य टिळक आणि त्यांच्या वारसा’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.चौसाळकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून टिळकांचे राजकीय जीवन, त्यांचे विचार आणि कार्य संबंधीचे विविध पैलू उलगडून दाखवले. डॉ.चौसाळकर म्हणाले, टिळकांच्या राजकीय कारकिर्दीचे प्रामुख्याने १८८० ते १८९९, १८९९ ते १९०८ आणि १९१४ ते १९२० हे तीन टप्पे पडतात. यापैकी विचारवंतांचे पाहिल्या दोन टप्प्याकडे जास्त लक्ष वेधले, परंतु तिसऱ्या टप्प्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. वास्तविक पाहता या तिसऱ्या टप्प्यातून लोकमान्यांच्या राजकारणाचे नवदर्शन घडते. टिळक हे सातत्याने बदलत जाणारे, नवनवीन विषयावर सतत चिंतन करणारे विचारवंत आणि नेते होते. आजच्या भारत देशाच्या जडणघडणीत तीन महापुरुषांचे मोलाचे योगदान आहे, ते म्हणजे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू होय. या तिन्ही विचारवंतांच्या विचार आणि कृतीमध्ये काही समान धागे आहे. टिळकांनंतर त्यांचा विचार आणि कार्याचा वारसा गांधी व नेहरूंनी पुढे चालवला. राजकारण हे पूर्णवेळ करण्याचे साधन असून, त्याकरिता लोकभाषेचा वापर आणि सरकारशी संघर्ष करण्याची तयारी हे त्यांच्या राजकीय जीवनाची तीन मुख्य सूत्रे होती. राजकीय कार्यासाठी कारावासाची शिक्षा भोगणारे टिळक हे देशातील पहिले राजकीय पुढारी होते, असेही त्यांनी सांगितले. थंडावलेल्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देण्याचे, निद्रिस्त भारतीयांना जागृत करण्याचे कार्य टिळकांनी आपल्या लेखणीद्वारे केले. त्यांचा गीतारहस्य हा ग्रंथ महत्वाचा राजकीय वारसा असून, निष्काम कर्मयोगाचे आयुष्य कसे जगावे हे त्यातील तत्त्वज्ञान सांगते, नवभारताच्या राजकारणासाठी त्यांनी काँग्रेस एकीकरण, हिंदू मुस्लिम ऐक्य आणि स्वराज्य हे तीन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यावर भर दिला. होमरूल चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवली. टिळकांच्या स्वराज्य प्रतिमानाच्या आधारे गांधींनी स्वराज्य चळवळ पुढे नेली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन त्रयींवर आधारित नवसमाज निर्मिती, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा टिळकांचा वारसा नव्या पिढीने जपून उद्याच्या नव भारताचे त्यांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य प्रा.डॉ. मकरंद साखळकर यांनी पुण्यतिथीनिमित्त टिळकांना अभिवादन करण्याची महाविद्यालयाची परंपरा जुनी असून, दरवर्षी महाविद्यालयातून टिळक स्मारक पर्यंत अभिवादन यात्रा काढण्यात येते. विद्यमान वर्षी टिळकांना प्रातिनिधिक स्वरूपात अभिवादन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात महाविद्यालयाच्या आदर्श विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा केली जाते. या कार्यक्रमात तृतीय वर्ष बी.एम.एस. च्या कु.ओंकार भागवत याला २०१९-२० चा आदर्श विद्यार्थी म्हणून घोषित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा.डॉ.निधी पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या व्याख्यानासाठी तिन्ही शाखेचे उपप्राचार्य, विभागप्रमुख, तसेच महाराष्ट्रातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. वरुणराज पंडित यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.

Comments are closed.