gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या फिल्म क्लबचा ‘फिल्म फेस्ट – २०२०’ उत्साहात संपन्न

gjc-film-club

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आर्ट्स फिल्म क्लबचा ‘फिल्म फेस्ट – २०२०’ हा चित्रपट महोत्सव नुकताच संपन्न झाला. यात प्रामुख्याने भाषा, सामाजिक शास्त्रे आणि वाणिज्य विभागातील क्लबच्या सदस्यांना भावतील अशा प्रकारच्या सामाजिक विषयांशी निगडीत असलेल्या आशयप्रधान चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. महाविद्यालाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये महोत्सवाचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर विज्ञानशाखेचे उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे, फिल्म क्लबचे उपाध्यक्ष प्रा. वासुदेव आठल्ये, डॉ. अतुल पित्रे उपस्थित होते.

या महोत्सवांच्या माध्यमातून चित्रपट केवळ करमणूक म्हणून न पाहता वेगळ्या दृष्टीने पाहण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये जोपासली जाते तसेच चित्रपटातील घटनांची सत्यासत्यता पडताळून चित्रकृतीच्या मागील संदर्भ तपासण्याची दृष्टी विकसित होते. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांची समज व कलाविषयक जाणीवा व्यापक होऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व संवेदनशील व अभिरुचीसंपन्न होण्यास मदत होईल असे मत प्रा. विवेक भिडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. सामाजिकदृष्ट्या जाणीवा जागृत करणाऱ्या व युवकांना प्रेरणादायी ठरणाऱ्या चित्रपटांच्या प्रदर्शनातून ज्ञान आणि मनोरंजनाचे उद्दिष्ट्य साध्य करता येऊ शकते असे मत आभारप्रदर्शनावेळी प्रा. वासुदेव आठल्ये यांनी व्यक्त केले.

विद्यमान वर्षीच्या या महोत्सवात अंधाधुन, मांजा, बाजार, व्हर्टिकल लिमिट या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. मानवी जीवनातील विविध समस्यांचे चित्रण करणाऱ्या, आर्थिक, सामाजिक, मनोरंजनात्मक पैलू असणाऱ्या या चित्रपटांचे अधिक सखोल आकलन व्हावे यासाठी क्लबने चित्रपट परीक्षणाची लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. याच वर्षी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी ‘उरी’ चित्रपट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या शासनाच्या मोहिमेत फिल्म क्लबने सक्रीय सहभाग घेतला होता.

चित्रपट या प्रभावी माध्यमाद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक व कलाविषयक जाणीवांचा विकास करता यावा यासाठी आर्ट फिल्म क्लबची स्थापना २०१३ साली करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते भारतातील विविध भाषांमधील चित्रपट, माहितीपट, लघुचित्रफित यांचे प्रदर्शन व त्यावर चर्चा क्लबद्वारे घडवून आणली जाते. आंतरराष्ट्रीय वसुंधरा चित्रपट महोत्सव या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महोत्सवाचे यशस्वी आयोजनात फिल्म क्लबने सहभाग घेतला होता.

या सर्व उपक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे विशेष प्रोत्साहन व विशेष मार्गदर्शन लाभले. या चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामध्ये प्रा. स्वप्नील जोशी, प्रा. मयुरेश पंडीत, प्रा. पंकज घाटे, प्रा. सचिन सनगरे, प्रा. मधुरा दाते, प्रा. तेजस भोसले यांनी सहभाग घेतला. आर्ट्स फिल्म क्लबचे सदस्य, चित्रपट रसिक अशा २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी तसेच कला व वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी या चित्रपट महोत्सवाचा आनंद घेतला.

Comments are closed.