gogate-college

विनय धुमाळे यांच्या लोकमान्य टिळकांवरील चित्रपट प्रदर्शनाने होणार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘फिल्म क्लब’चे उदघाटन

दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या फिल्म क्लब तर्फे ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध ह्क्क’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. लोकमान्यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविणाऱ्या या चित्रपटामद्धे या चित्रपटाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक असलेले श्री. विनय धुमाळे यांनी लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला असलेले योगदान, केसरी व मराठा मधील त्यांचे स्वराज्य, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबतचे निर्भीड विचार अशा बाबींवर प्रकाश टाकला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी नेता असण्याबरोबरच खगोलशास्त्रज्ञ, गणिती, भारतीय विद्या या क्षेत्रात अभ्यासपूर्ण कार्य करणारे संशोधक, श्रीमद भगवतगीतेचे विवेचन करणारे समीक्षक असे व्यक्तित्वाचे विविध आयाम हा चित्रपट उलगडून दाखवतो. श्री. अमित शंकर यांनी या चित्रपटात लोकमान्यांची भूमिका केली असून श्रीराम लागू, टॉम अल्टर या दिग्गज कलाकाऱांबोरबरच जी. के. गोखले, विनोद नागपाल, नागेश भोसले, रवी खरे, वियं जैन आदी अभिनेत्यांनीही या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
श्री. विनय धुमाळे यांनी त्यांच्या दूरदर्शनमधील प्रडर्घ सेवा काळात तसेच नंतरही सुमारे शंभर फिचर फिल्मस व व्यक्तिचित्रे निर्मिली आहेत. भारतीय दूरचित्रवाणीमधील त्यांच्या असाधारण योगदानासाठी त्यांना देशातील पहिला ‘जानकीनाथ गौड पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांनी आपले लोकमान्यांवरील चित्रपट काढण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी ते गेली वीस वर्षे प्रयत्नरत होते. आणि हा चित्रपट लोकमान्य टिळक यांच्या जन्मभूमीत प्रदर्शित व्हावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या फिल्म क्लबने हा चित्रपट विनामूल्य पाहण्याची पर्वणी लोकमान्य टिळकप्रेमी आणि इतिहासप्रेमी रत्नागिरीकरांना उपलब्ध करून दिली आहे. दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सायंकाळी ०५.३० ते ०८.०० या वेळेत सदर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन निर्माते-दिग्दर्शक श्री. विनय धुमाळे आणि महाविद्यालयाच्या फिल्म क्लबचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.