gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची ‘क्षेत्रभेट’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची ‘क्षेत्रभेट’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची क्षेत्रभेट उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान, चीरवली, ता. गुहागर तसेच वनस्पतींवर आधारित उद्योग म्हणून कृपा औषधालय, धोपावे, ता. गुहागर येथे नुकतीच संपन्न झाली. प्रथम विद्यार्थ्यांनी राई-भातगाव पुलाजवळील डोंगरावरील नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती घेतली. त्यानंतर कृपा औषधालय, धोपावे येथे कृपा हेअर टॉनिकसाठी लागणाऱ्या ब्राह्मी, मेंदी तसेच पुदिना इ. वनस्पती तसेच औषधी तेलाची निर्मितीप्रक्रिया, त्याचे पॅकिंग, सिलिंग प्रक्रिया समजून घेतली. यावेळी कृपा औषधालयाचे श्री. राजन दळी आणि सौ. रसिका दळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उद्योगांची माहिती देऊन त्यापासून प्रेरणा घेण्याची गरज व अस्तित्वात असलेल्यापेक्षा वेगळे आणि भारतात आवश्यक काय आहे हे शोधून काढून त्यामध्ये कार्य करण्याची गरज व्यक्त केली.

तरुणांच्यात उद्योजकीय गुण निर्माण होण्याच्या दृष्टीने जालना येथील पालाद समूहाचे मालक श्री. सुनील गोयल यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख उद्योजकांवर त्यांची यशोगाथा सांगणारी पुस्तके मराठीतून प्रकाशित केली आहेत. त्या सर्व २५ पुस्तकांचा संच श्री. राजन दळी यांनी महाविद्यालयास भेट म्हणून दिला. विक्रीकौशल्य निर्माण होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने मदत करण्याचे आश्वासनही दिले.

त्यानंतर सौ. रसिका दळी यांनी अलीकडेच चालू केलेल्या मातीपासून विविध भांडी बनविण्याच्या उद्योगाचीही सविस्तर माहिती दिली. माती भिजवणे, मळणे, साच्यातून भांड्यांची निर्मिती, भट्टीत भाजणे, भांड्यांचे सुशोभिकरण, पॅकिंग व विक्रीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी त्यांनी आपले शिक्षण गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झाल्याचे आवर्जून नमूद केले. त्यांनी मातीची एक घंटा महाविद्यालयास भेट दिली.

शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांनी पाटील जैवविविधता उद्यान, चीरवली येथे भेट दिली, जे तेथील आधीपासून संरक्षित असलेल्या देवराईच्या माहितीच्या व संरक्षणाच्या दृष्टीने सामाजिक वनीकरण विभागाने तयार केले आहे. तेथे विद्यार्थ्यांनी देवराई संकल्पना समजून घेऊन शेकडो वर्षे जुने सुरंगी, वड, हरडा, बेहडा यांसारखे वृक्ष व त्यावर वाढणाऱ्या उंबळीच्या खूप जुन्या जाड वेली यांचा अभ्यास केला. या क्षेत्रभेट उपक्रमात ४२ विद्यार्थी आणि तीन प्राध्यापक सहभागी झाले होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची ‘क्षेत्रभेट’ संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची ‘क्षेत्रभेट’ संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची ‘क्षेत्रभेट’ संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची ‘क्षेत्रभेट’ संपन्न
Comments are closed.