gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा प्राणीशास्त्र विभागातर्फे खारफुटी वन संवर्धन कार्यक्रम

प्राणीशास्त्र विभागातर्फे 'खारफुटी वन सवंर्धन' कार्यक्रम

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी ५ जून हा दिवस “जागतिक पर्यावरण दिन” म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खारफुटींच्या वनांचे महत्त्व लक्षात घेऊन गोगटे जोगळेकर महाविद्यालय त्यांच्या संरक्षण व व संवर्धना बाबत क्रियाशील आहे. खारफुटीची वने ही खाडी भागात एका विशिष्ट अधिवासात वाढतात. त्यांची प्रजोत्पादनाची प्रक्रिया एका विशिष्ट मुकुलिकेच्या (शेंगेच्या) रूपात पूर्ण होत असते. दरवर्षी एप्रिल ते जून या काळात त्या मुकुलिका परिपक्व होऊन पाण्यात रुजून येतात.

खारफुटीची वने हे विविध प्रकारच्या प्राणी तसेच पक्षांचे निवासस्थान आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ही वने निसर्गातील जैवविविधतेचे जतन करत आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग हा “Mangrove society of India” शी संलग्न असून खारफुटीच्या वनांच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम त्याद्वारे आयोजित केले जातात.

या उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाने मालवण येथील आचरा या गावातील जामडूलवाडी येथे एका एक दिवसीय सहलीचे आयोजन केले होते. जामडूल वाडी भागातील खाडीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात खारफुटीची वने आहेत. तेथे स्थायिक असणारे श्री. प्रमोद वाडेकर हे एक निसर्गप्रेमी असून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ते खारफुटीच्या वनांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. या एक दिवसीय सहलीमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिकणारे विद्यार्थी व प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मधुरा मुकादम, प्रा. अंबादास रोडगे, प्रा. मोहिनी बामणे व प्रा. मयुरेश देव सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना श्री. प्रमोद वाडेकर यांनी खारफुटीच्या विविध प्रजातींची माहिती व ओळख करून दिली. तसेच त्यांची रोपवाटिका तयार करण्यासाठी मार्गदर्शनही केले.

या मार्गदर्शनाचा उपयोग करून अशा प्रकारची रोपवाटिका महाविद्यालयाच्या आवारात तयार करून त्या रोपांची लागवड रत्नागिरीच्या खाडी परिसरातील ज्या भागामध्ये खारफुटींची संख्या कमी होत आहे, अशा ठिकाणी करण्यासाठी प्राणिशास्त्र विभाग प्रयत्नशील आहे. या प्रकल्पाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Comments are closed.