gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. डॉ. सप्रे हे १९८३ साली वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आपल्या २८ वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी गणित विभागप्रमुख, संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच बारटक्के इन्स्टिट्युटचे समन्वयक, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य, आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक अशा विविध जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडल्या. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या गणित विषयाचे अभ्यास मंडळाचे सदस्य, सी.डी.सी.चे सदस्य अशा विविध महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. आपल्या सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभाच्या सत्काराला उत्तर देताना डॉ. सप्रे म्हणाले, मी ३५ वर्षांचा अनुभव असलेला २५ वर्षांचा तरुण आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरही अनेक जबाबदाऱ्या स्विकारण्याची तयारी आहे. उर्वरित काळ हा गणिताचा अधिकाधिक अभ्यास करण्यासाठी देण्याचा, विशेषकरून वैदिक गणिताचा प्रचार व प्रसार करण्याचा तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गणित सोपे वाटावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या संपूर्ण प्रवासात त्यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची मोठी साथ मिळाल्याचा निर्वाळा दिला आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडूनही आपल्याला खूप आदर आणि प्रेम मिळाल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जुन नमूद केले.

डॉ. सप्रे यांचा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, महाविद्यालयाच्यावतीने प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालय आणि कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने प्रा. अनिल उरुणकर तसेच महाविद्यालयातील विविध विभागांच्यावतीनेही सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू असे या सत्काराचे स्वरूप होते.

याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रा. पतीक शितुत, प्रा. अनिल उरुणकर, श्री. प्रसाद तथा बापू गवाणकर यांनी आपली मनोगते व्यक्त करून डॉ. सप्रे यांना भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी हा निवृत्तीचा कार्यक्रम नसून एका वेगळ्या दिशेच्या वाटचालीची सुरुवात असल्याचे सांगितले. महाविद्यालयाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असून त्यामिनित्ताने सप्रे सरांना महत्वाची जबाबदारी सोपवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती डॉ. राजीव सप्रे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या सदिच्छा समारंभाला तीनही शाखांचे उपप्राचार्य, महाविद्यालयातील आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टंन्सिंग’चा योग्य पध्दतीने अवलंब करून सदर कार्यक्रम संपन्न झाला.

 

डॉ. राजीव सप्रे यांचा सदिच्छा समारंभ डॉ. राजीव सप्रे यांचा सदिच्छा समारंभ
Comments are closed.