gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये उर्दू-विषयाबद्दलचे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि राष्ट्रीय उर्दू भाषा परिषद, भारत सरकार यांचा उर्दू विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 फेब्रुवारी 2020 रोजी “महाराष्ट्र में उर्दू-तहकीक और तन्कीद: माझी, हाल और मुस्तकबिल” (महाराष्ट्रातील उर्दूची सद्यस्थिती आणि समिक्षा) या विषयावरील चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपद संस्थेच्या र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा मान. शिल्पाताई पटवर्धन यांनी भूषवले. खतीबे कोकण श्री. अली शमसी, कुवैत रायटर्स फोरमच्या अध्यक्षा श्रीमती मैमुना चौगुले आणि डॉ. अली परकार हे चर्चासत्रामधील विशेष अतिथी होते. चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दानिश गनी यांनी केले.

स्वागत कार्यक्रमामध्ये प्रसिध्द समीक्षक, कवी आणि पत्रकार श्री. शमीम तारीफ यांनी चर्चासत्राचे बीजभाषण केले. या भाषणामधून त्यांनी भारतीय संस्कृती आणि तिच्याशी असणारे उर्दू भाषेचे नाते याबद्दल सखोल विश्लेषण केले. तसेच या कार्यक्रमामध्ये डॉ. मोहम्मद दानिश गनी यांच्या ‘शेर के पर्दे मैं’ त्यांनी संपादन केलेल्या ‘महाराष्ट्र में उर्दू-तहकीक और तन्कीद’ व श्रीमती मैमुना चौगुले यांच्या ‘एहसास को छूकर गुजरती साअतें’ या पुस्तकांचे प्रकाशन ‘खतीबे कोकण’श्री. अली शमसी यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वागत समारंभानंतर महाराष्ट्रातील उर्दू भाषा व साहित्यातील संशोधन व समीक्षेबद्दलची चर्चा चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या संसाधन व्यक्तींनी केली. यामध्ये भाषेचा व साहित्याचा, विद्यार्थी व सामान्यांवर पडणारा प्रभाव, त्याची आवश्यकता, त्यामधील अंतर्गत प्रवाह तसेच साहित्य लेखन आणि वाचन यांचा प्रचार करण्यासाठी आवश्यक उपाययोजना इ. विषयांवर चर्चा करण्यात आली. ही चर्चा, सहभागी झालेल्या साधन व्यक्तींनी दोन सत्रांमध्ये केली.

चर्चासत्राच्या निरोप समारंभामध्ये श्री. शमीम तारीक यांनी दिवसभरातील घडलेल्या विविध चर्चांचा आढावा घेतला. तसेच श्री. शफी अय्युब व गजनफर इक्बाल यांनी यासारख्या चर्चासत्रांचे महत्व स्पष्ट केले. निरोप समारंभ श्री. अब्दुल नश्तर गनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

Comments are closed.