gogate-college

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे दि. २ नोव्हेंबर रोजी दरवळणार ‘दीपावली पूर्वसाज’ मैफिल

Sandip Ranade

रत्नागिरीकरांना दिवाळीनिमित्त श्री. संदीप रानडे, पुणे यांच्या सुश्राव्य गायनाचा आनंद घेता येणार आहे. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि भक्तीगीतांच्या सुश्राव्य गायनाची मैफिल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीतर्फे ‘दिवाळी पूर्वसाज २०१८’ आयोजित केली आहे. सदर मैफिल शुक्रवार दि. ०२ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृह येथे योजलेली आहे.

श्री. संदीप रानडे “नादरंग” हे मेवाती घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत. त्यांनी पद्मविभूषण संगीतमार्तंड पंडित जसराजजी, कै. डॉ. शोभा अभ्यंकर आणि सौ. अंजली जोगळेकर-पोंक्षे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. श्री. संदीप हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांनी अमेरिकेतील जॉन्स हॉपकीन्स युनिवर्सिटी मधून कॉंप्युटर सायन्स विभागात मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे. ते अमेरिकेत असताना गुगल, व्हीएमवेअर, मायक्रोसॉफ्ट अशा वेगवेगळ्या प्रथितयश कंपन्यामधे कार्यरत होते.

संगीतशास्त्रातील सौंदर्य, बारकावे आणि गणितीशास्त्रातील सिद्धांत यांच्या अनोख्या मिलाफाची प्रचिती संदीप यांच्या गाण्यातून येते. ‘नादरंग’ ह्या टोपणनावाने त्यांनी वेगवेगळ्या रागांवर, स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित अशा जवळजवळ ७० रचना केल्या आहेत त्यामधे विविध बंदिशी, तराणे, चतरंग, त्रिवट, गीत, रागमाला, अभंग, भावगीते, निर्गुणी भजन यांचा समावेश आहे. पारंपारिक तसेच नावीन्यपूर्ण आधुनिक संगीत यांचा सुरेख संगम संदीप यांच्या रचनांमधून झळकतो.

श्री. संदीप यांनी अनेक वर्षं साधना आणि सखोल अभ्यास करून रियाजाची एक नाविन्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे त्यानुसार दहा तासांचा रियाज एका तासामधे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करता येतो. या अविष्काराचे नाव “नादयोग” असून जगभरामधे विविध ठिकाणी जसे भारत, अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया येथे संदीप हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शिकवतात तसेच नादयोगाच्या कार्यशाळाही घेतात. शास्त्रीय संगीताच्या साधकांसाठी संदीप रानडे यांनी ‘नादसाधना’ हे अँप तयार केले आहे. रोजचा ‘रियाज अँप’ वापरून केल्याने स्वरस्थाने पक्की व अचूक होण्यास मदत होईल.

रत्नागिरीतील समस्त संगीत रसिकांनी या मैफिलीकरीता आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे आणि कै. यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीच्या अध्यक्ष डॉ. कल्पना मेहता यांनी केले आहे.

Comments are closed.