gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय दांडेकर मानचिन्ह स्पर्धा विजेता सागर पाटणकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय दांडेकर मानचिन्ह स्पर्धा विजेता सागर पाटणकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विविध कला गुणांचा संगम असलेला ‘झेप’ सांस्कृतिक युवामहोत्सव उत्साहपूर्ण आणि जल्लोषात संपन्न झाला. या महोत्सवातील अभिनय स्पर्धेचे अत्यंत मानाचे समजले जाणारे आणि ५३ वर्षांची परंपरा असलेले दांडेकर मानचिन्ह यावर्षी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या सागर सुनील पाटणकर याने पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण र. ए. सोसायटीच्या माजी कार्यवाह अ‍ॅड. प्राची जोशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे, झेप सांस्कृतिक युवामहोत्सव समन्वयक प्रा. आनंद आंबेकर उपस्थित होते.

नाट्य आणि अभिनय क्षेत्रात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला अभिनयाचा एक समृद्ध आणि अविरत असा वारसा लाभला आहे. साहित्य, संगीत आणि नृत्य अशा कलांबरोबरच अभिनयाच्या क्षेत्रातील अनेक कलावंत महाविद्यालयाने आजपर्यंत घडवले आहेत. तसेच अभिनयाच्या क्षेत्रात महाविद्यालयाने महाराष्ट्रात आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. उत्कृष्ट अभिनय स्पर्धेकरिता दिले जाणारे मानाचे असे ‘दांडेकर मानचिन्ह’ हे ‘झेप’ सांस्कृतिक युवामहोत्सवातील प्रमुख आकर्षण असते. या अभिनय स्पर्धेत एकपात्री आणि द्विपात्री अशा बहुरंगी नाट्यछटा कलेचे उपासक असलेले विद्यार्थी सादर करतात. यंदाचा दांडेकर मानचिन्हाचा मानकरी कोण ठरणार याची उत्सुकता सर्व विद्यार्थ्यांना लागून राहिलेली असते. स्पर्धेत सागर पाटणकर, सिद्धी गुरव, शुभम आंब्रे आणि अनुष्का दाभोळकर यांनी विजेतपद प्राप्त केले. या स्पर्धेला म्हणून माजी विद्यार्थी आणि राज्य नाट्य स्पर्धेत पाच वेळा अंतिम फेरीत प्रवेश केले ओंकार पाटील आणि प्रा. सुशील वाघधरे परीक्षक लाभले होत.

स्पर्धेचे आयोजन आणि व्यवस्थापन द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी केले होते. या कार्यक्रमाचा आस्वाद महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद जांगळे, वेदांग सौंदलगेकर आणि विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून घेतला.

Comments are closed.