gogate-college

‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्य समर्पित वृत्तीचे’- जिल्हाधिकारी सुनिलजी चव्हाण

‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्य सापरपीत वृत्तीचे आहे’ असे गौरवोद्गार मान. जिल्हाधिकारी सुनिलजी चव्हाण यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबुराव जोशी जयंती दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमप्रसंगी काढले. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी संस्थेच्या कार्यशैलीबद्दल, संघभावनेबद्दल कौतुकास्पद भाष्य केले. आणि त्यांच्या कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षणांबद्दल मनोगत व्यक्त करून देश घडविणारे शेवटी शिक्षकच असतात असे प्रतिपादन केले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे राधाबाई सभागृहात नुकताच कै. बाबुराव जोशी जयंती दिन साजरा करण्यात आला. सादर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनिलजी चव्हाण उपस्थित होते. प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपकार्याध्यक्ष ऍड. विजयराव साखळकर यांनी केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आल्यानंतर जी.जी.पी.एस.च्या विद्यार्थ्यांनी श्री. विजय रानडे यांच्या साथीने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.

कार्यक्रमप्रसंगी मंचावर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान. सुनिलजी चव्हाण, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव जोशी, कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, नियामक मंडळ सदस्य श्री. रमेश कीर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, डॉ. मकरंद साखळकर विराजमान होते.

दीपप्रज्वलनानंतर डॉ. मुकुंदराव जोशी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मान. सुनिलजी चव्हाण यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. यानंतर कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांनी संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. विनोद मयेकर यांना, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी श्री. सुरेश व्हटकर यांना तर विशेष उल्लेखनिय कार्य पुरस्कार श्री. संदिप तेंडुलकर यांना जाहीर केला. या सर्वांना तसेच शिर्के प्रशाला आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदके प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचादेखील जिल्हाधिकारी मान. सुनिलजी चव्हाण यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

आपल्या मनोगतात कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी दूरदर्शीपणा आणि पारदर्शक कारभार यांचे संस्था जीवनातील महत्व स्पष्ट केले.

शेवटी समारोपात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव जोशी यांनी संस्थापक कै. बाबुराव जोशी यांच्या जीवनातील धैर्यपूर्ण, खंबीर आणि स्थितप्रज्ञ वृत्तीचे दर्शन घडविणारे मोजके प्रसंग अत्यंत हृद्य पद्धतीने कथन केले. ज्यामुळे कै. बाबुरावांचे समग्र दर्शनच सर्व उपस्थितांना लाभले.

आभारप्रदर्शन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था कार्यक्रम समन्वयक प्रा. वालावलकर डी. आर. यांनी केले.

Mr Sunil Chavan
Comments are closed.