gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित रसायनशास्त्र कार्यशाळेचा समारोप

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित ‘रसायनशास्त्र कार्यशाळेचा’ समारोप

‘डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे विज्ञान प्रसाराचे कार्य ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून गोगटे जोगळेकर महाविद्यालय यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल’ असा विश्वास होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. सविता लडगे यांनी व्यक्त केला.

होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलत असताना मुलभूत विज्ञानाचे शिक्षण देण्याच्या पद्धती बदलण्याची गरज असून याकरिता प्रथम शिक्षकांना ही नवीन तंत्रे आत्मसात होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था अशा प्रकारच्या कार्यशाळा घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. सदर कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागाचे संचालक डॉ. संजय जगताप, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते.

पदवी स्तरावर अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांसाठी ‘एक्सपिरिमेंटल मोड्युलर फॉर अंडर ग्रॅज्युएट लॅबोरेटरी’ या विषयावरील सहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यशाळेच्या स्थानिक समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी कार्यशाळेचा इतिवृत्तांत सादरीकरणाच्या माध्यमातून विषद केला. डॉ. संजय जगताप यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन करताना पदवी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

सदर कार्यशाळा होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या ‘सिझमी’ (सेंटर फॉर एक्सलन्स इन सायन्स अॅड मॅथेमॅटिक्स) अंतर्गत असून केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी पंडीत मदन मोहन मालवीय राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग आहे. या उपक्रमात होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने प्रथमच मुंबई बाहेर कार्यशाळेचे आयोजन करताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची निवड केली याचा सार्थ अभिमान वाटतो असे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी नमूद केले.

श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी याप्रसंगी बोलताना ‘प्रत्येक क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल घडत असून या बदलांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते’ असे सांगून होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेसारख्या विज्ञान शिक्षणाच्या प्रसारासाठी नामांकित संस्थेतर्फे सदर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी रसायनशास्त्र विभागाचे अभिनंदन केले.

डॉ. मिलिंद गोरे यांनी आभार व्यक्त करताना भविष्यात अशाप्रकारच्या आणखी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील असा मनोदय व्यक्त केला.

कार्यशाळेला तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रा. सविता लडगे, डॉ. अंकुश गुप्ता, डॉ. सुजाता काळे, डॉ. आशा दातार,डॉ. अनुपमा कुंभार आणि प्रा. श्रेयांक मांडवकर मार्गदर्शन केले.

राज्याच्या विविध भागातून आलेले प्राध्यापक कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.

Comments are closed.