gogate-college-autonomous-logo

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. सोनाली कदम यांची शासकीय समितीवर नियुक्ती

गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. सोनाली कदम यांची शासकीय समितीवर नियुक्ती

रत्नागिरी शिक्षण संस्थेच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. सोनाली कदम यांची महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मान. श्री. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री. सामंत यांनी महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन शासनास शिफारसी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. सोनाली कदम यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. कदम या गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात सन २००७ पासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, तत्पूर्वी त्यांनी अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात आठ वर्षे अध्यापन केले आहे. सन २०१३ पासून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी म्हणूनही त्या काम पाहत आहे. त्यांचे विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये १४ शोधनिबंध, तर संपादित पुस्तकात ३ लेख आणि एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्या मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडिया, जर्नल ऑफ बायो नॅनो फ्रंटायर, मराठी विज्ञान परीक्षेच्या आजीव सभासद असून, पर्यावरण संस्था, रत्नागिरी विभागाच्या सदस्य अशा विविध बाह्य आस्थापनांवरही कार्यरत आहेत.

त्यांच्या नियुक्तीबद्दल र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, प्रबंधक श्री.रवींद्र केतकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ.सोनाली कदम यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.