gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ

Zep Cultural Festival

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या “झेप” या वार्षिक सांस्कृतिक युवा महोत्सवाला दि. २२ डिसेंबर २०१६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. ‘गो डिजिटल’ या मुख्य विषयावर आधारित हा सांस्कृतिक युवा महोत्सव दि. २४ डिसेंबर पर्यंत विविध बहारदार कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यावर्षी प्रथमच तीन दिवसात विविध १०० प्रकारच्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने विक्रमाकडे पाऊल टाकले आहे.

या बहारदार महोत्सवाची सुरुवात जीजीपीएस प्रशाला ते खातू नाट्यमंदिर अशा शोभा यात्रेने झाली. नटराजाची प्रतिमा असलेली पालखी, पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थी, ढोल-ताशे आणि लेझीम पथक या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. यानंतर खातू नाट्य मंदिरात “झेप”चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, सहकार्यवाह श्री. नरेंद्र पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाचे उपप्राचार्य अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. मकरंद साखळकर आणि डॉ. मिलिंद गोरे, उद्योजक व माजी विद्यार्थी श्री. विवेक देसाई, श्री. निलेश भोसले, पत्रकार श्री. सचिन देसाई, महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण समन्वयक प्रा. उदय बोडस, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. यास्मिन आवटे, झेपचे समन्वयक प्रा. आनंद आंबेकर आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर सादर झालेल्या नांदी, भरतनाट्यम, ढोलकी वादन, पाश्चात्य नृत्य यांनाही सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

“झेप”च्या पहिल्या दिवशी संस्कृत, गणित, भौतिकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र या विभागांनीही विविध प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. तसेच निसर्ग, संस्कार भारती, डिजिटल इंडिया यांसारख्या विषयांवर रांगोळी स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. याच दिवशी अंताक्षरी, वादविवाद, वक्तृत्व, फिल्म मेकिंग आणि अत्यंत मानाची समजली जाणारी ‘दांडेकर मानचिन्ह एकपात्री अभिनय स्पर्धा’ ही संपन्न होणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी थाटलेल्या फूड स्टॉलवरही लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी रोझ किंग आणि रोझ क्वीन तसेच चॉकलेट किंग आणि चॉकलेट क्वीन स्पर्धांचाही शुभारंभ झाला.

आगामी दोन दिवसात “झेप” या वार्षिक सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये फोटोग्राफी, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, गायन, मिमिक्री, नृत्य, विविध प्रकारची प्रदर्शने, फूड स्टॉल यांची रेलचेल असणार आहे.

Comments are closed.