gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे अवलोकन’ या विषयावरील कार्यशाळा संपन्न

GJC News

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे अवलोकन’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे फिशरिज महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. शेखर कोवळे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे विख्यात शास्त्रज्ञ डॉ. विशाल भावे आणि प्रा. रेश्मा पितळे, महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्रशाकीय उपप्राचार्य डॉ. ए. एस. कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते. या कार्याशाळेमध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालय; ए.एस.सी. महाविद्यालय, लांजा; दापोली अर्बन बँक सेनिअर कॉलेज, दापोली; खेड महाविद्यालय, खेड; मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, रत्नागिरी; फिशरिज महाविद्यालय; डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण या महाविद्यालयांनी सहभाग दर्शविला.

कार्यशाळेच्या प्रथम सत्रात श्री. विश्वास शिंदे यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. विशाल भावे यांनी महाराष्ट्राच्या विशाल सागरी किनारपट्टीवरील जैवविविधता आणि त्याच्या संवर्धनाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. रेश्मा पितळे यांनी सागरी संवर्धनाकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तर डॉ. ए. एस. कुलकर्णी यांनी खारफुटीची जैवविविधता आणि त्याची रत्नागिरीतील सद्यस्थिती याची सखोल माहिती दिली.

कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अभिरक्षक श्री. राहुल खोत यांनी ‘इ मॅमल इंटरनॅशनल-ए सिटीझन सायन्स इनिशिएटीव्ह’ या विषयावर माहिती दिली. तर डॉ. शेखर कोवळे यांनी मत्स्यसंवर्धन आणि त्याची गरज या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले कि, रविवारच्या सुट्टीचा उपयोग विद्यार्थ्यांनी निसर्ग मैत्री वाढविण्यासाठी सर्व; ज्यामध्ये त्यांनी निसर्ग सहल, निसर्ग चित्रे, छायाचित्रण, निसर्ग संशोधन याकरिता करावा.

या कार्याशाळेकरिता अनेक विद्यार्थी, महाविद्यालयीन प्राध्यापक उपस्थित होते.

Comments are closed.