gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात किल्लेविषयक अभ्यास कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे घेण्यात आलेली किल्लेविषयक अभ्यास कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, डेक्कन कॉलेज, पुणे येथी डॉ. सचिन जोशी, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये आणि इतिहास विभागप्रमुख डॉ. रमेश कांबळे उपस्थित होते. प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुखटणकर यांनी ‘अशा प्रकारच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रोजगार संधींचे दरवाजे मोकळे करून देऊ शकतात’ असे मत व्यक्त केले व कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.

कार्यशाळेचे पहिले दोन दिवस डॉ. सचिन जोशी यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी भारतातील किल्ल्यांचा इतिहास, कोकणातील विशेषतः खाडीकिनाऱ्यावरील जलदुर्गांचा इतिहास आणि स्थापत्य, किल्ले बांधण्याची पद्धत आणि दुर्गसंवर्धन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी किल्ला कसा पाहावा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी दुसऱ्या दिवशी पूर्णगड येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. तेथे त्यांना दुर्गव्यवस्था, वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य, जलदुर्गांचे भौगोलिक स्थान आणि सोळाव्या ते अठराव्या शतकातील कोकणातील व्यापार यांची माहिती दिली. किल्ला कोणत्या काळात बांधला गेला हे कसे ओळखावे त्याचप्रमाणे किल्ल्यावरून त्या काळी कशा प्रकारे चकमकी होत याची तोंडओळख विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी विद्यार्थ्यांना किल्ल्यावरून प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम पाहता आले. केवळ किल्ल्यांना भेट देणे पुरेसे नसते या जोडीला कागदपत्रे व इतिहास ग्रंथ पाहून एकत्रित अभ्यास करणे ही काळाची गरज आहे असे मत डॉ. जोशी यांनी मांडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसनही त्यांनी केले.

कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे येथील इतिहास संशोधक श्री. महेश तेंडूलकर यांनी ऐतिहासिक कागदपत्रांद्वारे किल्यांचा इतिहास याविषयी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची मोडी लिपीतील मूळ पत्रे वाचून दाखवत त्यांच्यातील कठोर प्रशासक व त्यांच्या राजनीतीचे निवडक पैलू यावर भाष्य केले.

चौथ्या दिवशी शहरानजीक असलेलेया रत्नदुर्ग किल्ल्यावर क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. हा किल्ला पाहताना किल्ल्यांवरील दैनंदिन हालचाली, मराठ्यांच्या काळातील किल्ल्यावरील लढाया व त्यासबंधीचे तत्कालीन कागदपत्रांतील काही रंजक किस्से त्यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी पुराव्याशिवाय कोणतेही विधान अथवा लिखाण करू नये असा सल्ला दिला. गडावरील खजिना, किल्ल्यांची देखभाल, दुरुस्ती, गडावरील असणाऱ्या अन्य इमारती व स्मारके याविषयी अधिक माहिती दिली. कार्यशाळेच्या अखेरच्या टप्प्यात श्री. तेंडूलकर यांनी विविध किल्ल्यांवरील द्वारशिल्पे, त्यावरील विविध प्रतीके, शरभ, गंडभेरुदंड यांची छायाचित्रे दाखवून किल्ल्यावर जाताना कशाप्रकारे शोध घ्यावा यासबंधी मार्गदर्शन केले .

विभागप्रमुख डॉ. रमेश कांबळे यांनी सदर कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून आलेल्या अभ्यासकांचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले व कार्यशाळेचा समारोप केला. चार दिवस चाललेल्या या कार्यशाळेत महाविद्यालयातील ४० विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल विभागाचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Comments are closed.