gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्पेस्ट्रोस्कोपी विषयाची राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, वेस्ट इंडिया सेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अॅडवान्सड् स्पेस्ट्रोस्कोपीक टेक्नीकल’ हि राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. दोन दिवसाच्या या कार्यशाळेदरम्यान विविध महाविद्यालयातून आलेल्या रसायनशास्त्राच्या पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांना स्पेस्ट्रोस्कोपी या विषयातील तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री हि इंग्लंडमधील नामांकित संस्था असून रसायनशास्त्रातील अद्यावत शिक्षण आणि संशोधन समाजापर्यंत पोहचवण्याच काम हि संस्था करते. जगभरात रसायनशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हि संस्था निधी उपलब्ध करून देते. या अंतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

इन्स्टिटयुट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजिचे मानद प्राध्यापक प्रो. एस. डी. सामंत इंडियन इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजि चे प्रो. सुवर्ण कुलकर्णी, मुंबई युनिव्हर्सिटी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. एम. व्ही रामन्ना, गोवा युनिव्हर्सिटीचे प्रो. व्ही. एस. नाडकर्णी, शिवाजी युनिव्हर्सिटीचे डॉ. जी. एस. राशिंकर अशा रसायनशास्त्र नामवंत व्याख्यात्यानी दोन दिवसाच्या कार्यशाळे दरम्यान स्पेस्ट्रोस्कोपी मधील विविध विषयावर मार्गदर्शन केले.

स्पेस्ट्रोस्कोपी हि विज्ञानातील एक महत्वाची शाखा असून रसायनशास्त्राद्वारे तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची संरचना कळण्यासाठी स्पेस्ट्रोस्कोपी मधील विविध शाखा जसे न्युक्लिअर मॅग्नेटीक स्पेस्ट्रोस्कोपी, मास स्पेस्ट्रोस्कोपी यांचा वापर केला जातो. औषध निर्माण उद्योग, कृत्रिम रंग, रासायनिक उद्योग तसेच न्यायवैद्यक शास्त्र, जैवतंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजि अशा सर्वच क्षेत्रामध्ये स्पेस्ट्रोस्कोपी तंत्राचा वापर केला जातो. विद्यार्थांना स्पेस्ट्रोस्कोपीतील ज्ञानाचा उपयोग उच्च शिक्षणासाठी, संशोधनासाठी तसेच त्यांच्या व्यावसायिक जीवनात होऊ शकतो हे लक्षात घेऊन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे या अतिशय महत्वाच्या अंतरशाखीय विषयावरती ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेच्या समारोप समारंभासाठी उपस्थित विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. ताम्हणकर यांनी या कार्यशाळेमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात उपयोग होईल असे नमूद केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांवर भविष्याचा वेध घेण्याची जबाबदारी असून या कार्यशाळेत मिळालेल्या अद्ययावत ज्ञानाचा वापर करून संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करा असे आवाहन केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कार्यशाळेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. जी. गोरे, पी.जी. कोऑर्डीनेटर डॉ. पी. पी. कुलकर्णी आणि विभागातील सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

या कार्यशाळेमध्ये बेळगाव, सांगली, दापोली, देवरुख, रत्नागिरी सबसेंटर तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळेच्या संयोजिका डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एम. पी. देसाई यांनी केले.

Comments are closed.