gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात गणितोत्सवाचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे दि. २२ डिसेंबर २०१६ रोजी जागतिक गणित दिवसाचे औचित्य साधून ‘गणितोत्सव’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. २२ डिसेंबर हा दिवस थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी महाविद्यालयात ‘गणिताचे विविध क्षेत्रातील उपयोग’ या विषयावरती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. गणित विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

१७२९ या रामानुजन संख्येचा गौरव म्हणून प्रदर्शनासाठी निवडलेल्या जागेला ‘रूम नं. १७२९’ असे संबोधण्यात आले. या प्रदर्शनांतर्गत इंटरनेट, जीपीएस नॅव्हीगेशन, तेल निर्मिती, कार्डेओलॉजी इ. क्षेत्रातील उपयोग नमूद करण्यात आले. त्याचप्रमाणे सापशिडी मॅप, गणितीय कोडी, प्रश्नमंजुषा यासारखे मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले. तसेच विद्यार्थांनी रेखाटलेली गणितीय रांगोळी लक्ष्यवेधी ठरली.

गणित विभागाचे प्रमुख डॉ. राजीव सप्रे आणि विभागातील सर्व शिक्षक यांनी सदर प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाकरिता मार्गदर्शन केले. तीनही शाखांतील विद्यार्थी तसेच विविध विषयाच्या प्राध्यापकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. र. ए. सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, गो. जो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि शास्त्र शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे यांनी गणित विभागाचे अभिनंदन केले.

Comments are closed.