gogate-college
KTS Parents Meeting

तुमचे विचार तुमच्या मुलांमध्ये उतरावा- श्री. उत्तम सुर्वे

तुमचे विचार, तुमची ध्येये तुमच्या मुलांमध्ये पाहिल्यास तुमचा पाल्य निश्तितच गुणवान होईल असा विश्वास रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी श्री. उत्तम सुर्वे यांनी व्यक्त केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांची कोकण प्रज्ञा शोध अंतिम निवड परीक्षा नुकतीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने गुणवान विद्यार्थांच्या ‘पालक सभे’चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम कै. डॉ. ज. शं. केळकर सभागृह येथे संपन्न झाला. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी श्री. उत्तम सुर्वे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे, प्रा. महेश नाईक, श्री. प्रसाद गवाणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

या सभेला मार्गदर्शन करताना श्री. सुर्व पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा अधिकारी घडवतात; यासाठी विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून अशाप्रकारचे मार्गदर्शन मिळाले तर त्यांचे महाविद्यालयीन जीवनात ते आपले उद्दिष्ट तडीस नेतील. कोकण प्रज्ञा शोध परीक्षा अशा प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांचे एक छोटे मॉडेल आहे. यातूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागेल. पालकांना आपल्या पाल्याचा व्यक्तिमत्व विकास साधताना आजच्या काळात खूप छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. नवीन पीढी खूप प्रज्ञावान असून आपण त्यांना योग्य दिशा देणे क्रमप्राप्त ठरेल. पालक म्हणून आपली जबाबदारी निर्णायक असून आपण ती आनंदाने निभावली पाहिजे. आपल्या भाषणाच्या अखेरीस त्यांनी पालकांच्या काही शंकांना उत्तरे देऊन संवाद साधला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेची २० वर्षांची पार्श्वभूमी विषद करताना या परीक्षेचे विविध टप्पे आणि त्यांची उपयुक्तता सांगितली. तसेच महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम आणि विद्यार्थांचे हित समोर ठेऊन आयोजित केले जाणारे उपक्रम याविषयी चर्चा केली. तसेच कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांच्या निकालांची परंपरा पालकांसमोर ठेवली आणि दहावीनंतर याचा विचार करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. महेश नाईक यांनी केले. या पालक सभेकरिता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचे पालक, कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचे विभागीय समन्वयक, शिक्षक, महाविद्यालयीन प्रध्यापक उपस्थित होते.

याच दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या विभागीय समन्वयकांच्या सभेचेही आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेच्या विस्ताराच्या दृष्टीने कशाप्रकारे योजनाबद्ध प्रयत्न करता येतील याविषयी चर्चा करण्यात आली. अनेक जिल्हा समन्वयकांनी आपले याबाबतचे अभ्यासपूर्ण विचार मांडले. या सभेला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी मार्गदर्शन केले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)