gogate-college-autonomous-logo

कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१७-१८ प्रज्ञावान विद्यार्थी हृषीकेश रपसे; प्रज्ञावान विद्यार्थिनी सानिका सोनवडेकर तर मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी ऋतिका उबळेकर

KTS-FINAL-EXAM-25-FEB-2018-2

‘विद्यार्थ्यांनी जीवनात कोणत्याही प्रकारच्या अपयशाने खचून न जाता उच्च ध्येय समोर ठेऊन ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. सुरुवातीपासून कोणताही अभ्यास मन लाऊन केल्यास ध्येय प्राप्ती होणे सुलभ आहे’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे निवासी जिल्हाधिकारी श्री. अभिजित घोरपडे यांनी केले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या प्रज्ञावान विद्यार्थांना संबोधित करताना ते बोलत होते. विस्तीर्ण सागरी किनारा लाभलेल्या कोकणाला याठिकाणी निर्माण होणारे अधिकारी खऱ्या अर्थाने गरजेचे आहेत. वीस वर्षांपूर्वी या परीक्षेच्या बीजाची पेरणी करताना तत्कालीन बुजुर्गांचेही हेच स्वप्न होते; आपण सर्व विद्यार्थी कोकणाचे निश्चितच उज्ज्वल असे भवितव्य आहात, याची मला खात्री आहे. अपयश आल्यास त्याचा विचार करून त्यावर मात करायला शिका. भविष्यकाळ घडवायचा असेल तर वर्तमान काळात कष्ट करा आणि जीवनातील सर्व अडचणींना सामोरे जा असा सल्ला दिला.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरता विद्यमानवर्षी घेण्यात आलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१७-१८ मधील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ रविवार दि. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाला. या गुणगौरव समारंभाकरीता व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीचे निवासी जिल्हाधिकारी मा. श्री. अभिजित घोरपडे; रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर; कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचे समन्वयक प्रा. दिलीप शिंगाडे, प्रा. महेश नाईक, प्रा. श्रीकांत दुदगीकर आदि मान्यवर उपस्थित होते.

कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या सन २०१७-१८ करिता प्रज्ञावान विद्यार्थी म्हणून हृषीकेश अनिल रपसे (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख); प्रज्ञावान विद्यार्थिनी म्हणून सानिका मंगेश सोनवडेकर (कै.सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, साडवली, देवरुख) आणि मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी म्हणून हृतिका रमेश उबळेकर (अलोरे हायस्कूल, अलोरे) हे विद्यार्थी पारितोषिकाचे मानकरी ठरले; उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. दिलीप शिंगाडे यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुणे निवासी जिल्हाधिकारी श्री. अभिजित घोरपडे यांचा सत्कार श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते संपन्न झाला. यानंतर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कोकण प्रज्ञा शोध परीक्षेविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली.

यानंतर ‘उत्कृष्ट तालुका समन्वयक पुरस्कार’ सौ. मनीषा अनिल सावंत (श्री देव गोपालकृष्ण विद्यामंदिर, गुहागर) यांना तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. विद्याधर त्रिंबक केळकर (रसायनशास्त्र विभाग) यांना उत्कृष्ट शिक्षक कार्यकर्ता आणि श्री. संदेश सीताराम रावणांग यांना उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू प्रदान करून गौरविण्यात आले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेकरिता विशेष उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल श्री. महेश कदम, श्री. रमाकांत सावंत, श्री. सुर्यकांत जड्ये आणि श्री. राजेंद्र जाधव यांना गौरवीण्यात आले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या उपयुक्ततेची आणि कोकणातील विस्तारासाठी कै. अरुअप्पा जोशी यांनी किती परिश्रम घेतले याची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी मला काय हवंय, मी काय करू शकतो आणि मला कोणते प्रयत्न करायला हवेत यांची विचारपूर्वक मांडणी केली तर यश तुमच्यापासून दूर जाणार नाही याची गोष्ट सांगितली. सकारात्मक दृष्टीकोन, समभाव दृष्टी, जिद्द आणि आत्मविश्वास तुम्हाला जीवनात यशस्वी बनवेल असे विद्यार्थांना आवाहन केले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या विस्ताराकरिता आपण अधिक महत्व देवू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव कानिटकर यांनी, बक्षीस वितरण समारंभाचे निवेदन प्रा. श्रीकांत दूदगीकर यांनी तर अभारप्रदर्शन प्रा. प्रभात कोकजे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाला प्रज्ञावान विद्यार्थी, त्यांचे पालक, तीन जिल्ह्यांचे कोकण प्रज्ञा शोध परीक्षा तालुका समन्वयक, शहरातील नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोकण प्रज्ञा शोध परीक्षा अंतिम निवड परीक्षेनिमित्त सकाळच्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांकरता ‘पालक सभेचे’ आयोजन करण्यात आले होते. या सभेत पालकांना वित्त व लेखा अधिकारी श्री. प्रशांत जगताप यांनी मार्गदर्शन केले. गुणवान विद्यार्थी आणि पालक यांच्याविषयी त्यांनी सविस्तर भाष्य केले. आपल्या मार्गदर्शनानंतर त्यांनी पालकांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

KTS-FINAL-EXAM-25-FEB-2018-2
KTS-FINAL-EXAM-25-FEB-2018
Comments are closed.