gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास दिन उत्साहात साजरा

‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लीष्टसानूम’ महाकवी कालिदासांनी केलेल्या मेघदुतातील या उल्लेखामुळे आषाढ महिन्याच्या प्रथम दिवशी म्हणजेच आषाढ शु. प्रतिपदेला या महाकावीचे स्मरण करण्यासाठी ‘कालिदास दिन’ सर्वत्र साजरा केला जातो.

प्रतिवर्षीप्रमाणेच यावर्षीही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात संस्कृत विषयात एम.ए. उत्तीर्ण होणाऱ्या कु. तृप्ती विजय रामाणे आणि ओंकार विजय मुळ्ये या विद्यार्थ्यांनी महाकवी कालिदास व त्याचे साहित्य या विषयांना अनुसरून विचार व्यक्त केले. प्रारंभी कवी कालिदासाच्या साहित्यातील श्लोकांचे गायन तृतीय वर्षातील कु. स्वरदा महाबळ, कीर्ती करकरे, प्रतिमा खानोलकर, मानसी पाथरे आणि प्रथम वर्षातील हर्षदा मुसळे, शितल पाध्ये या विद्यार्थिनीनी केले.

कु. तृप्ती रामाणे हिने ‘कालिदास-एक प्रतिभासंपन्न कवी’ या विषयावर विचार मांडले. तिने कालिदासाच्या श्लोकपुर्तीची व समस्यापुर्तीची उदाहरणे देत त्याच्या प्रीतिभेचे दर्शन बोलण्यातून घडविले. ओंकार मुळ्ये याने ‘अभिज्ञान शाकुंतल’ नाटकातील कण्व मुनींची व्यक्तिरेखा या विषयावर विचार व्यक्त केले. हा विषय मांडताना पिता व कन्या या नात्यावर, भावनांवर प्रकाश टाकला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्र गोस्वामी या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रा. जयंत अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप कु. प्राजक्ता मुसळे हिच्या शांती मंत्र पठणाने झाला. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष संस्कृतची विद्यार्थिनी कु. रुची दळी हिने केले.

या निमित्ताने ‘गीर्वाणकौमुदी’ या भित्तीपत्रकातील संस्कृतच्या विद्यार्थ्यांनी कालिदास या विषयावर तयार केलेल्या यावर्षीच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)