gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे जागतिक वन दिन साजरा क्षेत्र भेट, चर्चा व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

world-forest-day

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वन विभाग रोपवाटिका, खानू आणि स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान, खानू येथे ‘जागतिक वन दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जैवविविधता उद्यान व नर्सरी क्षेत्रभेट, वनांविषयी माहितीचे आदानप्रदान चर्चा आणि वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक वन विभाग, लागवड अधिकारी, रत्नागिरी श्री. अशोक लाड, सहा. लागवड अधिकारी श्री. नाचणकर, श्री. सांडव, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. शरद आपटे, डॉ. सोनाली कदम इ. मन्यवर आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सकाळच्या सत्रात सर्व उपस्थितांनी स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाला भेट दिली. कोकणातील वैशिष्टयपूर्ण अशा औषधी, व्यापारी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण वनस्पती प्रजातींचे येथे संवर्धन करण्यात आले आहे. नरक्या, गारंबी, मंजिष्ठा, घोटवेल, पायर, वड, पिंपळ, माकडलिंबू, गेळफळ, करवंद, जांभूळ, भारंगी, साग, सीता, अशोक, शिवण उक्षी, हिरडा, बेहडा, आवळा, किंजळ, नाटकनारी अशा विविध वैशिष्टयपूर्ण अशा वनस्पती प्रजातींची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच काही वनस्पती प्रजातींचे आर्थिक आणि पर्यावरणदृष्ट्या महत्व याबाबतची माहिती नोंदवली. तसेच हळद्या, बुलबुल, सर्पगरुड, धनेश इ. पक्षी आणि विविध फुलपाखरांचे निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांनी घेतली. प्रा. शरद आपटे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सोनाली कदम आणि वनरक्षक श्रीमती येवडेकर यावेळी उपस्थित होत्या.

‘जागतिक वन दिन’निमित्त आयोजित चर्चा सत्राच्या कार्यक्रमात सहा. लागवड अधिकारी श्री. नाचणकर यांनी कार्यक्रमाचे औचित्य आणि रूपरेषा विषद केली. सार्वजनिक वन विभाग, लागवड अधिकारी, रत्नागिरी श्री. अशोक लाड यांनी जागतिक वन दिन १९७२ पासून अन्न आणि कृषी संघटना, युनो यांच्या पुढाकाराने सुरु झाल्याचे सांगितले. पुढे त्यांनी जिल्ह्यातील वनराईचे अस्तित्व विषद केले. तसेच घटत्या वनक्षेत्रांचे प्रमाण सांगून त्याविषयी चिंता प्रकट केली. व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांनी वनीकरण कार्यक्रमात सहभागी होऊन निसर्ग जोपासण्याचे कार्य हाती घेण्याचे आवाहन केले. प्रा. शरद आपटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्यक्ष नैसर्गिक वनात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सजीव प्रजाती नष्ट होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोकणातील समृद्ध जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी येथील वनांचे आणि वन प्रजातींचे आपण काळजीपूर्वक निरीक्षण केले पाहिजे असे सांगून काही वनस्पतींविषयी आपणास अधिक संशोधन करण्याची संधी उपलब्ध आहे, त्याचा आपण फायदा घ्यावा त्यातून पुढे बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मिळवून त्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करता येईल, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. सोनाली कदम यांनी केले. यानंतर ‘रक्तचंदन’ या दुर्मिळ वृक्षप्रजातीचे वृक्षारोपण रोपवाटिका परिसरात करण्यात आले.

दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सार्वजनिक वन विभागाच्या रोपवाटीकेस भेट दिली. यावेळी त्यांनी विविध वनस्पतींच्या लागवडीविषयी तसेच रोप निर्मितीबद्दलची माहिती त्यांनी घेतली. तसेच पॉलीहाउसला भेट देऊन आधुनिक रोप निर्मितीच्या तंत्राविषयी सविस्तर माहिती घेतली. त्यांना श्री. नाचणकर यांनी मार्गदर्शन केले.

‘जागतिक वन दिन’निमित्त आयोजित या भरगच्च कार्यक्रमाच्या आयोजनात सार्वजनिक वन विभाग उपसंचालक श्री. धुमाळ आणि सहा. लागवड अधिकारी श्री. नाचणकर आणि सार्वजनिक वन विभाग, रत्नागिरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

world-forest-day
world-forest-day
world-forest-day
world-forest-day
world-forest-day
h
h
Comments are closed.