gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २७ फेब्रुवारी हा ‘मराठी राजभाषा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रा. जयश्री बर्वे यांचे ‘मराठी भाषा: जतन आणि संवर्धन’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाचा प्रारंभ कु. पूर्वा चुनेकर हिने सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर कु. निवेदिता कोपरकर हिने कवी कुसुमाग्रज यांची मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करणारी ‘माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा’ ही कविता सादर केली. तसेच कु. राज्ञी सोनावणे या शालेय विद्यार्थीनीने मराठी भाषा दिनानिमित्त लिहिलेली ‘माझी माय मराठी’ ही कविता कु. सानिका फटकुरे हिने सादर केली. यावेळी व्यासपीठावर इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अतुल पित्रे उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. जयश्री बर्वे म्हणाल्या, भाषेच्या उत्कर्ष हा समाजाचा उत्कर्ष तर भाषेचा ऱ्हास हा समाजाचा ऱ्हास असतो. युनेस्कोच्या अहवालानुसार जगातील सहा हजार भाषांपैकी सुमारे साडेचार हजार भाषा आज ऱ्हासाच्या वाटेवर आहेत. अशावेळी आपल्या भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तिचे जाणीवपूर्वक जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार भाषा उणावते आणि दुणावतेही. त्यामुळेच छत्रपती शिवरायांपासून स्वातंत्रवीर सावरकरांपर्यंत अनेकांनी भाषाशुद्धीचे प्रयत्न केले. त्यांची जाण ठेऊन आपण कटाक्षाने अचूक मराठी बोलले पाहिजे. बोलीभाषांबाबत आस्था ठेवली पाहिजे. आपल्या मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर घेऊन जायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचा जाणीवपूर्वक आस्वाद घेतला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

मराठी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली पिलणकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.