gogate-college
Zep - 2016

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप-२०१६’ सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात सांगता

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप-२०१६’ या युवा सांस्कृतिक महोत्सवाची खातू नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या दिमाखदार वार्षिक बक्षिस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाने सांगता झाली. तरुणाईचा सळसळता उत्साह आणि जल्लोषाने नटलेल्या या संस्कृत महोत्सवात विविध १०० प्रकारच्या स्पर्धांचे नेटके आणि यशस्वी संयोजन करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या संस्कुतिक महोत्सवाची सांगता देखील नृत्य, संगीत आणि गायन यांनी रंगतदार झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने करण्यात आली.

खो-खो या खेळातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ प्राप्त करणारी सुवर्ण कन्या, आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी आणि यापूर्वी ‘जानकी पुरस्कार’ प्राप्त झाला आहे अशी महाविद्यालयाची खेळाडू कु. ऐश्वर्या सावंत (प्रथम वर्ष कला) हिचा महाविद्यालयाच्या माजी खेळाडू सौ. मेधा महाजन-चावडा (सेन्ट्रल बँक) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, माजी क्रीडापटू श्री. उल्हास लांजेकर, श्री. संदीप तावडे, डॉ. मकरंद साखळकर, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यातील कला आणि क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थांचाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये आंतरविद्यापीठ स्तरावरील ‘इंद्रधनुष’ स्पर्धेत ‘गोल्डन गर्ल’ किताब पटकावणारी कु. स्नेहा आयरे तसेच विद्यापीठ, राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सांस्कृतिक विभाग, क्रीडा, वाङ्मय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना अशा विविध विभागांतून गुणवंत ठरलेले विद्यार्थी यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावर्षीच्या झेप या युवा सांस्कृतिक महोत्सवाकरिता ‘गो डिजिटल’ अशी थीम ठरविण्यात आली होती. खातू नाट्य मंदिरात सदर झालेल्या डान्स, सिंगिंग, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट अशा सर्व कार्यक्रमात विद्यार्थांनी या थीमचा वापर करत नाविन्यपूर्ण कार्यक्रम सदर केले.

याचबरोबर विविध विभागांनी आयोजित केलेली प्रदर्शने, रांगोळी, मेहंदी, टॅटू, नेल आर्ट, फनी गेम्स, फूड स्टॉल यांनी यावर्षीच्या झेप या युवा सांस्कृतिक महोत्सवाची रंगत वाढवली. तसेच विद्यार्थांच्या विविध कला गुणांना वाव देणाऱ्या मिमिक्री, एकपात्री, वादविवाद, वक्तृत्व अशा स्पर्धांनी तसेच महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर भव्य प्रमाणात आयोजित केलेल्या विविध इनडोअर व आउटडोअर क्रीडा स्पर्धांनीही या युवा महोत्सवात अधिकच बहर आणण्यास मदत केली.

झेप महोत्सवाच्या यशस्वी संयोजनासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कल्याण विभागाचे समन्वयक प्रा. उदय बोडस, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. यास्मिन आवटे, झेप समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, विद्यार्थी प्रतिनिधी जयदीप परांजपे, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed.