gogate-college-autonomous-logo

नव्या पिढीने राज्यघटना पुढे नेऊन जपण्याची गरज- डॉ. अशोक चौसाळकर

Political Science Department News

‘भारतीय संविधान लागू झाल्यापासून गेल्या ७० वर्षात काल-परिस्थिनुसार संविधानाची वाटचाल झालेली असून, नव्या पिढीने संविधान पुढे नेऊन ते जपण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित एका विशेष व्याख्यानात त्यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. बिना कळंबटे, डॉ. वामन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, समाजशास्त्र विभाग आणि सामाजिकशास्त्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. संजय जोशी स्मृती व्याख्यानमालेत ‘भारतीय राज्यघटनेची वाटचाल’ या विषयावर डॉ. चौसाळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांसमोर आपले विचार प्रकट करताना ते पुढे म्हणाले की, भारतीय नागरिकांच्या जीवनात संविधानाचे मूलगामी बदल घडवून आणले आहेत. हे बदल घडवून आणण्याचे श्रेय संविधाननिर्मात्यांच्या दृष्टीला द्यावे लागेल. मुलभूत हक्क हे नागरिकांशी संबंधित असून, मार्गदर्शक तत्वे ही राज्याशी सबंधित आहेत, राज्याने काय करावे याचे मार्गदर्शन ही तत्वे करतात. मुलभूत हक्कांमधील कलम १४, कलम १९, आणि कलम २१ ही तीन कलमे संविधानातील सुवर्ण त्रिकोण आहेत. गेल्या ७० वर्षांच्या वाटचालीत संविधानाने अनेकवेळा महत्वाची भूमिका बाजवली आहे. प्रस्थापित जातीव्यवस्थेला आव्हान देऊन समानता प्रस्थापित करण्याचे कार्य, सुशासन, सर्वांना प्रगतीच्या दिलेल्या संधी, न्यायालयांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे कार्य संविधानाने केले आहे. त्यामुळे आता संविधान जपण्याची जबाबदारी याव्या पिढीची आहे. त्यांनी ती समर्थपणे पार पडावी’ असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाविद्यालय करत असलेल्या वाटचालीचा लेखाजोखा सांगून, डॉ. अशोक चौसाळकर यांच्यासारखे अभ्यासू वक्ता लाभणे हा महाविद्यालयासाठी एक दुर्मिळ क्षण आहे. संविधान नागरिकांशी सबंधित महत्वाचा दस्ताऐवज असून, संविधानातील मुलभूत गोष्टी एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला ज्ञात असाव्यात असा आजच्या व्याख्यानाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद आंबेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. आरती पोटफोडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. राम सरतापे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रा. तुळशीदास रोकडे, प्रा. शिवाजी उकरंडे, प्रा. दिनेश माश्रणकर, प्रा. सचिन सनगरे, प्रा. निलेश पाटील, श्री. कुमार काकतकर, श्री. प्रसाद गवाणकर यांनी मेहनत घेतली. सदर व्याख्यानाकरिता महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.