gogate-college
Ambedkar Jayanti Celebration

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहपूर्ण वातारणात साजरी

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी प्रतिमापूजन, ग्रंथप्रदर्शन, भित्तीपत्रकाचे उद्घाटन आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे अभिवादनपर भाषण असा चौरंगी कार्यक्रम ग्रंथालयात संपन्न झाला.

दि. १४ एप्रिल २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयाच्या कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे आकर्षक असे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेतील ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘बहिष्कृत भारत आणि मूकनायक’ आदी पुस्तकांपासून ते उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेली चरित्र साधने, ‘बोल महामानवाचे’ ही डॉ. बाबासाहेबांची ५०० भाषणे, साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेले ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे के. राघवेंद्र राव यांनी लिहिलेले व श्री. धनंजय कीर यांनी लिहिलेले डॉ. बाबासाहेबांचे चरित्र आदी उत्तमोत्तम ग्रंथांचा समावेश होता. तसेच डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवरील भित्तीपत्रकाचेही अनावरण याप्रसंगी करण्यात आले.

यानंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपल्या मनोगतातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक पैलू उलगडले. ज्ञानी, विजीगिषु, वाचक, नियोजक अशा पैलूंचा मागोवा घेताना डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील विविध घटनांचे दाखले दिले. गावी लग्नाला गेले असताना देवळात वाचत बसणारे बाबासाहेब, रत्नागिरीतील कोर्टात कुळांच्या बाजूने लढणारे बाबासाहेब अशी त्यांची विविध रूपे श्रोत्यांच्या मन:चक्षुसमोर उभी केली. बौद्धिक संपत्तीवर विजय मिळविला तरच आपण पुढे जाऊ शकू हा डॉ. बाबासाहेबांचा विचार त्यांनी सांगितला आणि डॉ. आंबेडकर यांची ग्रंथसंपदा वाचून त्यांचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प आजच्या शुभदिनी करूया, असेही आवाहन केले.

या संपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शनाचा लाभ दोन दिवसांपर्यंत विद्यार्थीवर्गाने घेतला, ही विशेष समाधानाची बाब असल्याचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी नमूद केले. उपस्थितांचे स्वागत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले.

Comments are closed.
 
  • 2017 (138)
  • 2016 (37)