gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालायात महिला सक्षमीकरणावर चर्चासत्र संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष, अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि महाराष्ट्र शासनाचा महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणावर आधारित एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवर वक्त्यांनी चार सत्रांमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पहिले तत्र लासलगाव, नाशिक येथील प्रा. प्रतिभा जाधव यांनी घेतले. ‘सावित्री तू होतीस म्हणून’ या आपल्या कथाकथनाच्या कार्यक्रमातून त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही भारतात महिला सक्षमिकरणावर चर्चासत्र घ्यावे लागते ही खेदाची बाब आहे. ज्याप्रमाणे सावित्रीबाईनी पुढचा विचार करून स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली, त्याप्रमाणे आजच्या विद्यार्थींनी बदलत्या काळाची पावले ओळखून स्वत:ची आणि पर्यायाने समाजाची प्रगती साधली पाहिजे.

दुसऱ्या सत्रात अॅड. संध्या सुखटणकर यांनी ‘महिला विषयक कायद्यांची’ माहिती दिली. त्या म्हणाल्या की, भारतातील कायदे हे स्त्रियांच्या सक्षमिकरणासाठी पोषक आहेत. त्यामुळे महिलांच्या मनात सुरक्षिततेची आणि सक्षमतेची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. त्यांनी गर्भलिंग निदान विरोधी कायदा, हुंडाबंदी कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, स्त्रियांना असणारा समान संपत्तीचा अधिकार, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधातील कायदा अशा विविध कायद्यांची माहिती दिली. तसेच हुंडा ही प्रथा नसून मानसिकता आहे. त्यामुळे आजच्या विद्यार्थीनी भविष्यात ही बाब कायम लक्षात ठेवावी, असे आवाहन केले.

तृतीय सत्रात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक श्री. रवींद्र साठे यांनी महिलामद्दे नेतृत्वगुणांची वाढ होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नेतृत्वगुणांचा विकास होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता असते याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे मनोविकासात्मक मनोरंजनाचे विविध खेळ घेतले. महिलांकडे उपजत नेतृत्व करण्याची क्षमता असते, मात्र याची जाणीव ठेऊन त्यांनी स्वत:चा विकास साधला पाहिजे असे सांगितले.

अखेरचे सत्र ‘महिला आरोग्य’ या विषयावर होते. यामद्धे वसई येथील सामाजिक कार्यकर्त्या मीनल निकम आणि महाविद्यालयातील प्रा. हर्षदा पटवर्धन यांनी सॅनिटरी नॅपकीनविषयी मार्गदर्शन केले. बाजारात उपलब्ध असणारे विविध कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकीन, त्यातील हानीकारक तत्वे, त्यांचे शरीरावर होणारे घातक परिणाम, कॅन्सरचा वाढता धोका याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांनीमद्धे जागरूकता निर्माण केली. त्याचप्रमाणे जैविक विघटनशील सॅनिटरी नॅपकीनबाबत माहिती दिली. ग्रामीण भागातील मुलींमध्ये या विषयाबाबत जाणीव आणि जागृती व्हावी यासाठी महाविद्यालयीन तरुणींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली.

या महिला सक्षमीकरणावर आधारित एकदिवसीय चर्चासत्राकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, प्राध्यापिका, रत्नागिरी शहर तसेच परिसरातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Comments are closed.