gogate-college-autonomous-logo

समाजशास्त्र विद्याशाखेच्या शतकवर्ष पूर्ततेनिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. मारुलकर यांचे व्याख्यान संपन्न

‘भारतीयत्व हे डॉ. घुर्ये यांच्या संशोधनाचं सार आहे’ असे उद्गार ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. विजय मारुलकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना काढले. भारतीय समाजशास्त्र या ज्ञानशाखेस शंभर वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून ‘भारतातील समाजशास्त्राची शंभरी’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी भारतीय समाजशास्त्राचा उदय आणि विस्ताराचा ऐतिहासिक पट उपस्थितांसमोर मांडला.
भारतीय समाजशास्त्राचे जनक असलेले डॉ. गोविंद सदाशिव घुर्ये यांचा जन्म कोकणातील मालवण येथे झाला. वसाहतवादी अभ्यासकांनी भारतीय समाजाचे जे संशोधन केले ते त्यांच्या फोडा आणि झोडा या राजनीतीची प्रेरित होते. डॉ. घुर्ये यांनी आपल्या विपुल लेखनाने त्यावर प्रहार केले. प्राचीन धर्मग्रंथाच्याआधारावर ‘प्राच्यविद्याशास्त्रीय’ दृष्टिकोनास प्राधान्य दिले. भारतीय समाज हा जातीआधारित समाज असल्याने त्यांनी ‘जाती अध्ययन’ हे आपल्या संशोधनाच्या केंद्रस्थानी मानले. त्यांनी डॉ. एम. एन. श्रीनिवास, डॉ. इरावती कर्वे, डॉ. एम. एस. गोरे, डॉ. विलास संगवे या नामांकित समाजशास्त्रज्ञांना संशोधक विद्यार्थी म्हणून मार्गदर्शन केले. अनेक संशोधन ग्रंथांचे लेखन करताना जाति, वंश, गोत्र, पुराणं, भारतीय साधू, सामाजिक तणाव असे विषय त्यांनी आपल्या लेखनाच्या केंद्रस्थानी ठेवले. भारतीय संस्कृतीचा शोध घेणे डॉ. घुर्ये यांनी महत्वाचे वाटले.
स्वातंत्र्योत्तर काळात पूर्वोत्तर राज्यातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी शिफारस डॉ. घुर्ये यांनी केली. एवढेच नाही तर पंजाबमधील दहशतवात मोडून काढण्यासाठी प्रत्यक्ष सैनिकी कारवाही करण्यासाठीची शिफारस त्यांनी केली होती. समस्यास्यांच्या सोडवणुकीसाठी समाजशास्त्रज्ञाने आपल्या संशोधनातून महत्वाची भूमिका बजावली पाहिजे अशी त्यांची धारणा होती. भारतीयत्व हेच त्यांच्या संशोधनाचे सार होते, असे डॉ. मारुलकर यांनी स्पष्ट केले.
समाजशास्त्र शताब्दीवर्षानिमित्त अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा प्रारंभ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने केला. आपल्या कोकणवासीय सुपुत्राने या ज्ञानशाखेची पायाभरणी केली अभिमानाची आणि विद्यार्थी संशोधकांसाठी प्रेरणादायक बाब आहे असे या महाविद्यालयाला वाटले हे खूप महत्वाचे आहे; असे मत डॉ. मारुलकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वामींनी चव्हाण आणि कु. सुरभी वायंगणकर, प्रास्ताविक प्रा. शिवाजी उकरंडे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. रामा सरतापे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे, डॉ. वामन सावंत, प्रा. बिना कळंबटे आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Dr Marulkar Speech
Comments are closed.